मुंबई : येत्या 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे  प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दौऱ्याचं नियोजन केलं जाण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासून वादविवादांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. सिंह यांच्या मागणीला मनसेच्या नेत्यांकडूनही प्रतिआव्हान देण्यात आलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.

अधिक वाचा  अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मनसेकडून त्यासाठी जोरदार तयारी देखील केली जात आहे. अयोध्याला जाण्यासाठी मनसेकडून 10 ते 12 रेल्वेगाड्या बुक केल्या जाणार असल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हे देखील अयोध्याला जाणार असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून मनसेला खोचक टोला लगावणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे.