खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाच्या हट्टामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यावेळी आपल्याला पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा आरोप राणा दाम्पत्याने केला होता. त्यानंतर पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांनी या दोघांचा चहा पितानाचा व्हिडीओ व्हायरल केला होता.

आपल्याला मागासवर्गीय असल्याने पाणीही दिलं नाही, असा आरोप राणांनी पोलिसांवर केला होता. त्यालाच उत्तर देताना पोलिसांना या दोघांचा पोलीस स्टेशनमध्ये बसून चहा पितानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर पोलीस स्टेशनमध्ये नक्की घडलं काय, हे अद्याप स्पष्ट नव्हतं. पण आता रवी राणांनी स्वतःच याविषयीचं स्पष्टीकरण दिलं आहे. आपण पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो, असं त्यांनी सांगितलं आहे.

अधिक वाचा  रिहे येथे ग्रामस्थांना सनदांचे वाटप

मुंबईतून दिल्लीला रवाना होत असलेल्या राणा दाम्पत्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रवी राणा म्हणाले,”अजित पवार म्हणाले की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो. होय, आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो. जेव्हा आम्हाला अटक करण्यात आली, तेव्हा आम्हाला आणि आमच्या वकिलांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा पाजला आणि तुम्हाला जामीन देतो असं सांगण्यात आलं. पण त्यानंतर आम्हाला सांताक्रूझ पोलीस स्टेशनला नेण्यात आलं, माध्यमांना कोणालाच माहिती दिली नाही. आम्हाला रात्री बारा वाजता सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये नेलं, सकाळी तुम्हाला न्यायालयात नेऊ असं सांगितलं. पण त्यानंतर रात्री १२.३० नंतर नवनीत राणांना त्रास देण्यात आला. मी विधीमंडळाचा आमदार असतानाही त्रास दिला. आम्हाला सकाळी ५ वाजेपर्यंत पाणी आणि सतरंजी दिली नाही. नवनीत राणांना कारागृहात उभं राहावं लागलं.”  त्या सगळ्या परिस्थितीची अजित पवार यांनी माहिती घ्यावी. कारण राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. एका महिला खासदाराला कशाप्रकारची वागणूक दिली गेली याचीही अजित पवार यांनी माहिती घ्यावी,” असंही रवी राणा यांनी सांगितलं.