हडपसर: हडपसरच्या दिशेने वाहणाऱ्या नवीन मुळा-मुठा कालव्यात रविवारी दिवसभरात तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. वैदूवाडी येथे दोन पुरुषांचे मृतदेह सापडले. तेथून काही अंतरावरच्या शिंदेवस्ती येथे एका तरुणाचा मृतदेह वाहत आला. हडपसर पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन मृतदेह बाहेर काढले. यातील एकाची ओळख पटली असून, इतर दोघांची ओळख तपासण्याचे काम पोलिस करीत आहेत. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तीन व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास वैदूवाडी वाहतूक शाखेच्या शेजारील कालव्यात साचलेल्या कचऱ्याभोवती दोन पुरुषांचे मृतदेह आढळले. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. हडपसर भागातील जीवरक्षक बच्चूसिंग टाक, आझादसिंग टाक आणि जवानांनी कालव्यातून तीन मृतदेह बाहेर काढले.

अधिक वाचा  ज्ञानवापीवर कंगना राणौत म्हणाली- 'काशीमध्ये कणा कणात महादेव'

या मृतदेहांची पाहणी केली असता ते ४० ते ४५ वयोगटातील पुरुषांचे मृत्यदेह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांची ओळख पटली नाही. यानंतर दुपारी दीड वाजता शिंदे वस्ती येथील कालव्यात आणखी एका तरुणाचा मृतदेह आढळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. अज्ञात व्यक्तींच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी तपास केला असता एका मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले.

जाधव घरी आलेच नाहीत…

प्रमोद जाधव (वय ४२, रा. आनंदनगर, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) यांची सिंहगड पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. ते शुक्रवारी सकाळी कामाला जातो; म्हणून घराच्या बाहेर पडले. नंतर ते घरी आलेच नाही. एक मृतदेह जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तृप्ती खलाडे यांनी दिली. याबाबत हडपसर व सिंहगड रस्ता पोलिस तपास करीत आहेत.