पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर टोलेबाजी केली आहे. पुण्याची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी होत असते. तसेच शरद पवार यांनीसुद्धा पुण्यातील अनुभव घेतला असून त्यांनी असाच एक अनुभव सांगताना भाजप नेत्यांवर टीका केली आहे. शरद पवार म्हणाले, पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होतं, नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा. गिरीश बापट, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला यांची मैत्री महापालिकेत प्रसिद्ध आहे. अनेक वेळा अनेक जागा पुण्यात आम्ही जिंकल्या. पण मला अजून लक्षात आले नाही, गिरीश बापट कोठेही उभे राहतात अन्‌ विजयी होतात. एकदा बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्‍य झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

अधिक वाचा  सुप्रिया सुळे : "नरेंद्र मोदी यांनी एवढ्या संस्था विकल्या,आणि आम्हाला विचारतात की...

शरद पवार यांनी पुण्यात अंकुश काकडे यांनी लिहिलेल्या हॅशटॅग पुणे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम पक्षीय भेदाभेद पलीकडच्या मित्रत्वाच्या हक्‍काने मारलेले टोमणे आणि रंगतदार किश्‍श्‍यांनी रंगला.

दरम्यान पुस्तकावरून शरद पवार म्हणाले की, आता हे पुस्तक पाहिल्यावर याच कारण बापट, अंकुश आणि शांतीलाल यांची मैत्री आहे की काय? असा संबंध आहे का? हे मला तपासावे लागेल, अशी कोपरखळीसुद्धा पवारांनी लगावली आहे. आपल्याबरोबर पण इतर पक्षात काम करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांबरोबरच आजही असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांचीच झालेली फजिती, त्या काळात सोबत असलेल्या नगरसेवकांबरोबर झालेले गंमतीदार किस्से विनोद यावेळी काकडे यांनी सांगितलेच. परंतु त्याचे साक्षीदार असलेले बापट आणि उल्हास पवार यांनीही त्यात भर घातली. बापट यांनीही काकडे यांच्या किश्‍शांना दाद दिलीच. पण आपण केंद्रात पोहोचलो पण आपल्या या मित्राला निदान विधान परिषद तरी द्या, अशी विनंती त्यांनी पवारांना केली. पण त्यातही “कोश्‍यारी’ असेपर्यंत काकडेंना विधान परिषद मिळणार नाही, असा टोमणाही लगावला त्यावेळी सभागृहात हशा पिकला.