पुणे –हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्‍यात आला असून प्रतवारीनुसार आंब्याचे भाव बाजारात 400 ते 800 रुपये डझनदरम्यान आहेत.हवामान बदलामुळे हापूस आंब्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला.

अवकाळी पाऊस, धुक्‍यामुळे आंबा लागवडीवर परिणाम झाला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हापूसची बाजारात आवक झाली. त्यानंतर मार्च महिन्यात हापूसची आवक नियमित झाली. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात हापूसचे दर चढे होते. आवकही अपेक्षेएवढी होत नव्हती. यंदाच्या हंगामात आंब्यांची आवक टप्याटप्याने होत गेली. आवक नियमित होत नव्हती. त्यामुळे आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्‍यात नव्हते, असे मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा  धक्कादायक! पुण्यात वनाज मेट्रो कारशेडच्या कामादरम्यान ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

अक्षय तृतीयेच्या आधी आंब्याची आवक वाढली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच अक्षय तृतीयेला आंब्याची मोठी आवक झाली. गेल्या आठवड्यात 1 ते 3 मे दरम्यान मार्केट यार्डातील फळ बाजारात कोकणातून एकूण मिळून 25 ते 30 हजार पेट्या हापूसची आवक झाली. अक्षय तृतीयेला आंब्याची आवक वाढली होती. मात्र, मागणी जास्त असल्याने आंब्याचे भाव चढे होते. त्यानंतर रविवारी (8 मे) मार्केट यार्डातील फळ बाजारात कोकणातून हापूसच्या 10 ते 15 हजार पेट्यांची आवक झाली. आंब्याची आवक वाढल्याने भावात घट झाली. हापूसच्या पेटीमागे 1 हजार ते 1200 रुपयांनी घट झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

अधिक वाचा  दापोली; हर्णै समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पर्यटकांवर टोळक्यांकडून कोयत्याने वार

हापूस आंबा आता आवाक्‍यात आला आहे. आता सामान्यांना हापूसची चव चाखता येणार आहे. हंगामाची अखेर होण्यास आणखी 10 ते 12 दिवसांचा कालावधी आहे.