पुणे –सिंहगडावर जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई-बसेस सुरू केल्या. मात्र बसेसची अपुरी संख्या आणि नियोजनाच्या अभावामुळे सध्या पर्यटकांची गैरसोय होत आहे.बसेसमधून उभे राहून गडावर जावे असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून, येत्या काळात गडावर 15 बसेस धावणार आहेत.

सिंहगडावरील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने “माझा सिंहगड, माझा अभिमान’ या मोहिमेंतर्गत वन विभाग आणि पीएमपीएमएलच्या वतीने सिंहगडावर जाण्यासाठी 1 मेपासून बससेवा सुरू केली. या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी होती. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‌विटरवर माहिती दिली.

अधिक वाचा  राज्यात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ

चार्जिंग स्टेशन्स वाढणार
सध्या 7 ई-बस या मार्गावर धावत असून, येत्या काळात 15 बसेस धावणार आहेत. तर सध्या सिंहगडाच्या पायथ्याला एक चार्जिंग असून, यामध्येदेखील वाढ होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. मात्र याबाबत प्रवासी संघटनांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. शहरातील प्रवासी आणि बसेसची स्थिती लक्षात घेता शहरात अधिक बसेस आवश्‍यकता असल्याचे मत प्रवासी मंचाचे सचिव संजय शितोळे यांनी सांगितले.