पुणे : दुसऱ्याच्या शेतात गवत कापायला जाऊन आईने केलेली मजुरी, कष्टाने गाळलेल्या घाम नजरेसमोर होता. घरात बसून एकट्यात रडताना तिचे हुंदके आजही आठवतात. लोकांच्या शेतात राबून हातावरचा संसाराला सावरत जगायला व लढायला शिकवले.

पैसा नव्हता तरीही आईने मोठ्या कष्टातून माझे व भावंडांचे शिक्षण केले. पोरांनी शिकून मोठ्ठं नाव कमवावं, हीच तिची जिद्द. तिच्या जिद्दिमुळेच आज मी पोलीस उपनिरीक्षक झालो आहे. आज मी जो काही आहे तो फक्त अन् फक्त आईमुळेच.

आमचं गाव बारामती तालुक्यातील वाणेवाडी. वडील तानाजी जाधव मासेमारीचा व्यवसाय करत तर आई संगीता ही दुसऱ्यांच्या शेतात जाऊन गवत आणून गुरे सांभाळत. माझी आई अशिक्षित असली तरी शिक्षणाची काय किंमत असते, याची तिला चांगलीच जाणीव होती. मला चांगलं आठवतं की, मी इयत्ता सहावीला असताना माझ्या पायाच्या टाचा खूप दुखत होत्या. मुलाचा अभ्यास मागे पडू नये म्हणून ती स्वतः मला शाळेत दोन महिने घेऊन जात होती. कारण शिक्षकांनी सांगितले होते की, तुमची मुलं हुशार आहेत त्यांना चांगलं शिकवा. शाळेत होणाऱ्या पालक मेळाव्यात वडीलांपेक्षा आईच जादा वेळा हजर असे. यावेळी तिला नेहमी वाटत असे की, इतरांच्या मुलांप्रमाणे आपल्या मुलांचेही पालनपोषण व्हावं. पण परिस्थिती गरिबीची त्यात डोक्यावर कर्ज. त्यामुळे बऱ्याचवेळा मी आईला हतबल होताना पाहिलंय. त्या काळात कुणाचाही साथ मिळत नव्हती. राहायला नीटनेटके घरही नव्हते. त्याही स्थितीत हलाखीचे जीवन जगत मुलांवर चांगले संस्कार केले व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला.

अधिक वाचा  पुण्यात राजकीय वातावरण तापलं; राष्ट्रवादीचे भाजपविरुद्ध मूक आंदोलन

आम्ही तीन भावंडे आज सुशिक्षित आहोत. मी सिंहगड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करतो आहे. तर मधला भाऊ योगेश हा पोलीस कॉन्स्टेबल आहे. तर सर्वात लहान भाऊ दत्तात्रय स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. मी ज्यावेळी पोलीस उपनिरीक्षक झाल्याचे समजताच माझी आई स्वतः पदर खोचून माझ्यासाठी फटाके लावत होती. नुकताच साद संवाद स्वच्छ्ता संस्थेकडून तिला आदर्श माता म्हणून पुरस्कारही देण्यात आला आहे.