कोथरूड बावधन परिसरातील बावधन खुर्द स.नं. 64 कचरा संकलन व हस्तांतरण प्रकल्पाला बावधन भागातील नागरिकांचा तीव्र विरोध होत असून बावधन,भुगाव, भुकुम या भागातील स्थानिक नागरिकांनी काल या प्रकल्पाला विरोध करत मुख्य पौड रस्त्यावर २ किलोमीटर मार्ग मानवी साखळी तयार करत निषेध नोंदवला. चांदणी चौकातील पौड रस्ता मुळशी तालुक्‍याचे मुख्य प्रवेशद्वार असून याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र होवू नये यासाठी काल शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी निषेध नोंदवत मानवी साखळीतून कचरा प्रकल्प हटवण्याची मागणी केली. यावेळी माजी खासदार प्रदीप रावत, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे, अल्पनाताई वर्पे, PDCC उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह भूगाव भुकूम भागातील ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण,पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला देहू नगरीत

या मानवी साखळीत दिलीप वेडेपाटील फाउंडेशन, बावधन सिटीजन फोरम, वसुंधरा स्वच्छता अभियान, जीवित नदी, मिशन ग्राऊंड वाटर, पराडकर फौंडेशन, वसुंधरा क्लब, जलदेवता अभियान, जल बिरादरी अश्या विविध संस्था व मुळशी मधील सर्व पक्षीय नेते मंडळी व नागरिकांच्या सहभागातून मानवी साखळीतून पुणे महानगरपालिका व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

बावधन खुर्द स.नं. 64 याठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्र प्रकल्प रद्द करण्याचा ठरावास 29 डिसेंबर 2021 रोजी मान्यता मिळाली दिली असूनही कचरा हस्तांतरण केंद्र याठिकाणी हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. हा प्रस्ताव केल्यास या परिसरातील नागरिकांच्या रोषास पुणे महापालिकेला सामोरे जावे लागेल.

अधिक वाचा  सेनेचा राजेंना धक्का....; ठिणगी कोणी लावली अन् टीकेचा, त्रासाचा धनी? सुजय विखे

तसेच हा कचरा डेपो येथून हटवण्यासाठी आमचे एक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांना भेटणार आहे. या परिसरातील नागरिकांसह पुणे महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र जन-आंदोलन करण्यात येईल तसेच चांदणी चौकातून एकही पुणे मनपा ची कचरा गाडी या प्रकल्पाकडे येवू देणार नाही असा इशारा मा. नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी पुणे महानगरपालिकेस दिला आहे.