नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने दोन नवीन न्यायाधीशांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या नावाच्या मंजूरीनंतर त्यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली असून जवळपास ३० महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ३४ न्यायाधीशांची क्षमता पूर्ण झाली आहे. दरम्यान गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुधांशू धुलिया आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जमशेद बी पार्डीवाला यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा आज शपथविधी पार पडला असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्षमता पूर्ण झाली आहे. मागच्या जवळपास अडीच वर्षे न्यायाधीशांची क्षमता पूर्ण नव्हती त्यानंतर ६ मे रोजी न्यायालयाने या दोन न्यायाधीशांची शिफारस केल्यावर ४८ तासांच्या आत केंद्राने मंजूरी दिली होती आणि त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

अधिक वाचा  केतकी चितळेचीही महाराष्ट्रवारी?; १२ वा गुन्हा दाखल: Post वर ठाम असल्याचे न्याालयास सांगितले

या दोन न्यायाधीशांच्या शपथविधीनंतर उद्या लगेच न्यायाधीश विनीत शरण हे निवृत्त होत आहेत त्यामुळे सर्वोच्च न्यायालायची क्षमता फक्त एका दिवसांसाठी पूर्ण होणार आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या मंजूर पदाच्या बरोबरीची असेल पण उद्या विनीत शरण आणि ७ जूनला न्यायाधीश एल. नागेश्वर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची संख्या अपूर्ण असणार आहे.

आज शपथ घेणार असलेले न्यायाधीश सुधांशू धुलिया हे उत्तराखंडचे असून त्यांचा जन्म १० ऑगस्ट १९६० रोजी झाला होता तर ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. तसेच न्यायाधीश जमशेद बी पार्डीवाला यांचा जन्म मुंबईत झाला असून गुजरातमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे. १२ ऑगस्ट १९६५ रोजी त्यांचा जन्म झाला असून ते सध्या गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. दरम्यान ते २०२७ साली देशाचे सरन्यायाधीश होणार असल्याचं बोललं जातंय. बी. व्ही. नागरत्ना यांच्या निवृत्तीनंतर ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.