मुंबई- अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. इतक्या वर्षांपासूनची त्यांची वृक्ष संवर्धनाची तळमळ आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. नुकतेच सयाजी शिंदे यांनी सायन रुग्णालय परिसरातील झाडे तोडण्यावर एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे.

सयाजी शिंदे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शिवाय काही फोटो पोस्ट करत त्यांनी म्हटलं आहे की, ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं 158 जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? याला दुसरा काहीच पर्याय सायन रुग्णालयाकडे नाही का? असा संतप्त प्रश्न त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.

अधिक वाचा  शैलेश लोढा यांना मिळाला मोठा प्रोजेक्ट, तारक मेहताचा उल्टा चष्मा सोडल्यानंतर करणार हे काम

सयाजी शिंदे व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत की,ही अत्यंत वाईट बातमी आहे की सायन हॉस्पिटल परिसरातील 158 वृक्ष कापण्याची परवानगी दिली आहे ही परवानगी का दिली..आणि यातील दोन झाडं कापलेले आहेत. त्याच्यावर नंबर देखील पडलेले आहेत आणि आता यमानं सांगावं की, ती 158 माणसं आम्ही मारणार आहोत. तसं या झाडांवरती बॉम्ब टाकल्यासारखं होणार आहे.

ते पुढे म्हणतात की, त्या झाडांवरच्या पशुपक्षांचा संसार नष्ट होणार आहे. तरी ही परवानगी का दिली? ही टाळता येऊ शकते का? झाडं वाचू शकतात का? याबाबत लगेचच विचार व्हावा कारण आपण सर्वांनी अनुभवलं की ऑक्सिजन सिलेंडरमधूनच विकतच घ्यावा लागला होता. चांगलं ऑक्सिजन देणारी झाडं का कापायची? सह्याद्री देवराईच्या वतीने मी बोलतोय की कृपया ही झाडं वाचवा, असं ते कळकळीनं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना दिसत आहेत.