मुंबई- मुंबईतील सांताक्रूझ भागात असलेल्या एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली आहे. कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असून, याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.सकाळची वेळ असल्याने ऑफिसमध्ये कोणीच नव्हते ही दिलासादायक बाब होती.

मुंबई अग्निशमन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी कार्यालयात भीषण आग लागली असून त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. ते म्हणाले की, गेल्या दीड तासापासून अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आजतागायत पूर्णपणे आटोक्यात आलेले नाही.

अधिक वाचा  राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका; शाम देशपांडे यांचा अखेरचा जय महाराष्ट्र

मुंबई अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पगार बचत योजना विभाग असून त्यामधील संगणक, फाइल रेकॉर्ड, सर्व लाकडी फर्निचर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले.