मुंबई – कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहताना त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी शाहू महाराज हे दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे नेते होते, असे गौरवोद्गार उद्धव ठाकरेंनी काढले. तसेच शाहू महाराजांनी ज्या वृत्तीविरोधात संघर्ष केले ती संपवणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण विधानही मुख्यमंत्र्यांनी केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जगात अनेक राजे होऊन गेले. त्यातील अनेकांची नावंही आपल्याला आठवत नाहीत. काही राजे नुसतेच गादीवर बसले. मात्र शाहू महाराज हे केवळ गादीवर बसणारे राजे नव्हते. ते कधी गादीवर आरामात बसून राहिले नाही. शाहू महाराज हे दीननदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे राजे होते. त्यांनी अस्पृश्यांना माणसासारखे वागवावे, यासाठी संघर्ष केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांबाबत सांगितलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.

अधिक वाचा  कसला विश्वासघात? जागा सेनेचीच, उद्याच फॉर्म भरणार- राऊत

शाहू महाराज समाजतील चुकीच्या वृत्तींविरोधात कामच लढले. आज जातीपातींमध्ये फार असमानता राहिलेली नाही. जिकडे आहे तिथूनही ती संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराज लढले, ती वृत्ती आज खरोखरच संपली आहे का, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. या वृत्तीने शाहू महाराजांना का छळलं तर त्याचं कारण म्हणजे ते गरीब, दीनदुबळ्यांना मदत करत होते. त्यामुळे आज आपण आपले राजे ज्या वृत्तीविरोधात लढले ती प्रवृत्ती जिथे जिवंत आहे, तिथून संपवण्याची प्रतिज्ञा करूया. तसेच शिवछत्रपतींचं, शाहू महाराजांना अपेक्षित असलेला समाज आणि राज्य निर्माण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.