सातारा : माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साताऱ्यातील फलटण पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांची पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतिफ तांबोळी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

दिगंबर आगवणे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. खासदार निंबाळकर यांनी आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं आगवणे यांनी तक्रारीत म्हटलं होतं. या तक्रारीसोबतच सर्व आकडेवारी आणि पुरावे न्यायालयात सादर केले होते. यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन त्यांच्याविरुद्ध भा.द.वि. 405, 406, 418, 420, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.महत्त्वाचं म्हणजे दिगंबर आगवणे हे एकेकाळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कट्टर कार्यकर्ता होते.

अधिक वाचा  पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेत गेलेले मनसेचे नेते पुन्हा स्वगृही परतणार...

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
– रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढ्यातील खासदार आहेत.
– माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे ते सुपत्र
– फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी ओळख
– 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसने आपल्याला माढ्यातून उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह केला होता. परंतु जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
– भाजपच्या तिकीटावर त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव केला.