पुणे : पुण्याचे माजी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे हे दोन दिवसानंतर पुण्यात परत आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर वसंत मोरे हे तिरुपती बालाजीला गेले होते. त्यानंतर ते पुण्यात आल्यावर माध्यमांशी बोलत होते.

आमच्या प्रभागात हनुमान चालीसा पठण झाली नाही. मी जरी इथे नसलो तरी माझे मनसैनिक सज्ज होते असं म्हणत सध्या मी जरा शांत आहे आणि माझ्या कुटुंबाकडे आणि व्यवसायाकडे लक्ष देत आहे. असे ते माध्यमांना बोलताना म्हणाले.

मी दरवर्षी बालाजीला जात असतो. गेल्या 17 ते 18 वर्षापासून मी बालाजीला जात असतो. दीड महिन्यापूर्वी बुकींग केले होते. तो माझा पूर्वनियोजीत दौरा होता, त्यामुळे गेलो होते असे मोरेंनी सांगितले. मशिदीसमोर भोंगे लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरे अज्ञातस्थळी गेले होते. मात्र, त्यांनी माझा बालाजीला जाण्याचा पूर्वनियोजीत कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो असल्याचा खुलासा केला आहे.

अधिक वाचा  तिच्या बांगड्या काढू नका, कुंकु पुसू नका..; अंत्यविधीवेळी रुपाली चाकणकरांनी पुढाकार घेतला अन्...

त्यांच्या स्टेटसबद्दल प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, “मी राजमार्गावर आहे आणि राजमार्गावरंच राहणार आहे. तुम्ही माझ्या स्टेटसमधील खालचे दोन वाक्य वाचले पण सुरूवातीचे वाक्य तुम्ही घेतले नाही त्यामुळे तुम्हाला तसं वाटंत असेल. सध्या मी पक्षाचं १३ वर्ष काम करुन थकलो आहे, मी अस्वस्थ नसून मी शांत आहे.” असं ते म्हणाले आहेत.

आमच्या प्रभागात भोंग्याबाबतच्या नियमांचं पालन होत असून मी नेहमीच मनसेसोबत एकनिष्ठ आहे, काही मतभेद आहेत पण आमच्यात मनभेद नाहीत. पक्षांतर्गत कुरघोडी या पक्ष मोठा होत असताना होत असतात पण मी सध्या राजमार्गावरंच आहे.” असं ते म्हणाले.