पुणे – रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी तसेच, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र, स्मोक डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी आणि आवश्यक फलक लावण्यात आले आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुणे विभागातील ७ हजार ९३१ रेशन दुकानांना आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले.
रेशन दुकानांमध्ये स्वच्छता ठेवण्यासोबतच शिधापत्रिकाधारकांना दर्जेदार धान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील रेशन दुकानांसोबतच पुरवठा उपायुक्त कार्यालय, पाच जिल्हा पुरवठा कार्यालये, दोन अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालये, ६० तहसील कार्यालये, १५ परिमंडळ कार्यालये आणि ८० गोदामे असून, या सर्व १६३ कार्यालये आणि गोदामांना आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
अन्न व पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश डांगी, सोमनाथ वचकल आदी या वेळी उपस्थित होते.
रेशन दुकानदारांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रेशन दुकानांमध्ये सामान्य सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ‘सीएससी’ केंद्राच्या माध्यमातून रेशन दुकानदार घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे-विमान तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे बिल (उदा : वीजबिल, फोनबिल, पाणीबिल, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज) या सुविधा देऊ शकतात.