मुंबई : देशभरात लाऊडस्पीकरच्या अजानवरून वाद सुरू आहे अशात दक्षिण मुंबईतील धर्मगुरू आणि विश्वस्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मशिदींमध्ये सकाळी लाऊडस्पीकर लावले जाणार नाहीत असा निर्णय मुंबईतील मोहम्मद अली रोड, मदनपुरा, नागपाडा, मुस्लीमबहुल भागांसह 26 मशिदींच्या धर्मगुरूंनी सुन्नी बादी मशिदीत बैठक घेऊन एकमताने हा घेतला आहे.

त्यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की लाऊडस्पीकरवरून सकाळची अजान वाचली जाणार नसून सर्व मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जाईल. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत अजान आणि लाऊडस्पीकरचा वापर केला जाणार नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेत भोंग्यांसदर्भातील आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.जोपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचं ते म्हणाले. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर दुप्पट आवाजात भोंग्यावर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व धार्मिक स्थळांना लाऊड स्पीकरसाठी परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून धार्मिक स्थळांना ३० दिवसांच्या कालावधीसाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  काँग्रेसला भंडाऱ्यातही झटका बसणार! जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपची याचिका दाखल

मुंबईतील ११४० मशिदींपैकी १३५ मशिदींनी बुधवारी पहाटेची अजान लाऊड स्पीकरवर वाजवल्याचं समोर आलं होतं. मुंबई पोलिसांकडून त्या मशिदींच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समोर आली होती. राज ठाकरेंनी देखील त्या मशिदींवर काय कारवाई करणार असा सवाल केला होता. राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक स्थळांनी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यास सुरुवात केली आहे.