नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असेही शरण सिंह म्हणाले. राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत रामल्लांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

अधिक वाचा  आईनेच नवजात अर्भकास शौचालयाच्या भांड्यात कोंबलं, पुणे पोलिसांमुळे वाचले तान्हुल्याचे प्राण

कैसरगंज येथील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला आणि ते उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी,” असे भाजपा खासदारने म्हटले आहे.

दुसऱया ट्विटमध्ये ते म्हणतात की, जोवर राज ठाकरे माफी मागत नाहीत तोवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटूही नये. राम मंदिर आंदोलनापासून भव्य मंदिराच्या निर्मितीचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद व सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यांचीच यात मुख्य भूमिका आहे. या ठाकरे परिवाराला या साऱ्या आंदोलनाशी काही देणे घेणे नाही.