मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात दिलेल्या अल्टिमेटमनंतर राज्यात तणावाचं वातावरण सुरू आहे. मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला होता. मात्र, राज ठाकरे यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, असं म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या भुमिकेला पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जुने शिवसैनिक राज ठाकरेंशी सहमत आहेत. राज ठाकरेंनी मशिदींवरून लाऊडस्पीकर खाली उतरवणे आणि रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. यापूर्वी हे मुद्दे स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे आता शिवसैनिकांना राज ठाकरेंच्या भूमिकेशी असहमत दर्शवणे कठीण जात आहे.

अधिक वाचा  मान्यता नसलेल्या शाळांवर होणार कारवाई, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक यांचा इशारा

राज्याच्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण यासाठी असहमत कसे होऊ शकता?, बाळासाहेब नेहमीच याच मुद्द्यावर ठाम राहिले आहेत. राज ठाकरे यांच्याऐवजी आपणच हा मुद्दा उपस्थित करायला हवा होता, असं मुंबईतील माजी शाखाप्रमुख म्हणाले. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला आमचा ९९ टक्के पाठिंबा असल्याचा दावा काही सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील केला आहे.