मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ मे रोजी मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे नेत्यांना ताब्यात घेतले जात होते.’शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी पोहचले होते. मात्र यावेळी घरातून बाहेर निघाल्यानंतर देशपांडे आणि धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांच्या तावडीतून निसटले. शिवतीर्थबाहेर पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक वाचा  महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी स्थायी समितीचे अस्तित्व कायम राहते, न्यायालयात याचिका दाखल

संदीप देशपांडे काय म्हणाले?

सकाळी मी राज ठाकरेंना भेटायला गेलो होतो. माध्यमांच्या प्रतिनिधींनी बाईट मागितला. मी त्यांच्याशी संवाद साधत असताना दादर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासार तिथे आले. त्यांनी मला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला ताब्यात घेत आहात का? असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर ताब्यात घेत नाही, गर्दी होत असल्यानं बाजूला घेत असल्याचं त्यांनी सांगितलं,’ अशा शब्दांत देशपांडेंनी घटनाक्रम सांगितला.

माध्यमांशी बोलत असताना पोलीस निरीक्षक कासार मला थोड्या अंतरावर घेऊन गेले. सकाळपासून मी कोणतंही आंदोलन केलेलं नाही. मग मला ताब्यात का घेत आहात, असा प्रश्न मी त्यांना विचारला.आतापर्यंत आम्ही पोलिसांना सहकार्यच करत आलो आहोत. अनेकदा स्वत: मी पोलीस ठाण्यात हजर झालो आहे. पोलिसांचा आम्ही सन्मानच करतो. मी धक्काबुक्की केल्याचं, महिला पोलिसाला जखमी केल्याचं कासार साहेबांनी हृदयावर हात ठेवून सांगावं. मी खोटं बोलत असेन, पण सीसीटीव्ही फुटेज, माध्यमांचे कॅमेरे खोटं बोलणार नाहीत, असंही देशपांडे म्हणाले. मी पळून गेलो नाही. आम्ही अटकेला घाबरत नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो आहे असं त्यांनी सांगितलं.