पुणे: राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कालपासून आंदोलन सुरु केलं आहे.

काल राज्यात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसाचं पठण केलं. तर काही ठिकाणी स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. यावेळी अनेक ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली. दरम्यान या संपूर्ण आंदोलन काळात पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत.

या आंदोलनात ते नॉट रिचेबल होते. मात्र त्यांच्या नॉट रिचेबलची चर्चा रंगताच त्यांनी स्वतः त्या बाबतचा खुलासा केला आहे. वसंत मोरे यांनी फेसबूक पोस्ट करुन आपण कुठे होतो याचा खुलासा केला आहे. पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आलो असल्याचं त्यांनी आपल्या फेसबूकच्या पोस्टमध्ये म्हटलं.

अधिक वाचा  २१ जिल्ह्यांत निवडणुकांवर पावसाचे सावट! सरासरीपेक्षा अधिक पाऊस

वसंत मोरे म्हणाले, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशा नंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार.