ओबीसी आरक्षण सर्वांनी कळीचा मुद्दा केलेला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जाहीर करण्याची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रात पुन्हा रणसिंग फुंकले जाणार असून यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट लढती होतात कि वेगवेगळ्या आघाड्या याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सध्या महाविकास आघाडी एकत्र निवडणुका घेण्याच्या मानसिकतेमध्ये असली तरीही भाजप आणि मनसे युती न झाल्यास महाविकास आघाडी ही मैत्रीपूर्ण लढतीच्या भूमिकेकडे झुकत असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून कळत आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भोंगा आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलखोल आंदोलन राष्ट्रवादी च्या वतीने परिवार संवाद यात्रा काँग्रेस पक्षाच्या वतीने जुमला आंदोलन अशी विविध आंदोलने सुरू करत आपल्या पक्षाची चर्चा जनतेच्या मनात राखण्याचे काम केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही 14 मे रोजी जाहीर सभा घोषित झाली असून त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता नोंदवली जात आहे. ठाकरे यांची सभा जाहीर झाल्यानंतर आज निवडणूक आयोगाच्या निकाला नंतर या सभेला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने या सभेमध्ये कार्यकर्त्यांना आदेश मिळण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे पुढे ढकलल्या गेलेल्या आणि मुदत संपलेल्या अशा एक-दोन नव्हे, तर एकूण 22 महानगरपालिकांमध्ये यंदा निवडणूक होणं अपेक्षित आहे. काही निवडणुकांची मुदत संपून वर्ष लोटलं, तर काही निवडणुकींची मुदत दोन-तीन महिन्यात संपणार आहे.

खरंतर कायद्यानुसार मुदत संपण्याआधी महापालिकांच्या निवडणुका घेणं बंधनकारक असतं. मुंबई महापालिकेची (BMC) मुदत संपत आल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 2020 वर्षामध्ये पाच महापालिकांची मुदत यापूर्वीच संपली असून त्यावरही प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या पाच महापालिकांची मुदत संपलेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकांच्या मुदती संपल्या आहेत आणि येत्या दोन-चार महिन्यात कुठल्या महापालिकांच्या मुदती संपणार आहेत, तसंच या महापालिकांमध्ये आता कुणाची सत्ता आहे, याचा सविस्तर आढावा….

2019 साली राज्यातील सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. आगामी महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेल्यास निवडणुकीचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोणती समीकरणं पाहायला मिळतील, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळासह लोकांमध्ये आहे. महाराष्ट्रातील सर्व 27 महापालिकांची मुदत कधी संपतेय, याचा सविस्तर आढावा घेऊया.

1) मुंबई महानगरपालिका

मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपली असून, मार्चमध्ये निवडणूक होणं अपेक्षित असल्याचं निवडणूक आयोगानं संकेतस्थळावर म्हटल होते. पण मुंबई महापालिकेची (BMC) मुदत संपत आल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 227 जागांच्या मुंबई महापालिकेत यंदा जागाही वाढवण्यात आल्यात. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या 236 जागा असतील.

अधिक वाचा  लातूरच्या विकासासाठी ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू…’ देशमुख

गेल्या दोनहून अधिक दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, 2017 च्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली. शिवसेना (84), भाजप (82), काँग्रेस (31), राष्ट्रवादी (9), समाजवादी पक्ष (8), मनसे (7), एमआयएम (2) आणि इतर (3) अशा जागा 2017 च्या निवडणुकीत मिळाल्या होत्या.

मात्र, यंदा महाविकास आघाडीसाठी एकत्र आलेल्या पक्षांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही वेगळी समीकरणं पाहायला मिळतात का, याची उत्सुकता अनेकांना आहे.

2) ठाणे महानगरपालिका

131 जागांच्या ठाणे महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. 2017 साली या महापालिकेत शेवटची निवडणूक झाली होती. 5 मे 2022 रोजी ठाणे महापालिकेची मुदत संपत असून, मार्च 2022 मध्येच निवडणूक होणं अपेक्षित होते.

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांचं प्राबल्य असणाऱ्या ठाणे महापालिकेत आता मनसे, काँग्रेस आणि एमआयमकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

3) नवी मुंबई महानगरपालिका

राष्ट्रवादीचे माजी नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरची नवी मुंबई महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. गणेश नाईक यांचं या महापालिकेवर वर्चस्व राहिलं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक यावर्षी म्हणजे 2020 च्या मे महिन्यातच पार पडणं अपेक्षित होतं. कारण 8 मे 2020 रोजी नवी मुंबई महापालिकेची मुदत संपली होती.

मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. 2022 मध्ये इतर इतर महापालिकांसोबतच नवी मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.

111 जागांच्या नवी मुंबई महापालिकेत 2015 सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक जिंकले होते. मात्र, त्यावेळी गणेश नाईक राष्ट्रवादीत होते. शिवसेना इथे दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. मात्र, आता गणेश नाईकांनी भाजपात प्रवेश केल्यानं निवडणुकीचं चित्र काय असेल, याकडे नवी मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

4) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

कल्याण-डोंबिवली महापालिकेत 122 जागा आहेत. सध्या या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्षही आपली ताकद राखून आहेत. 10 नोव्हेंबर 2020 रोजी म्हणजे वर्षभरापूर्वीच कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुदत संपलीय. मात्र, कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक प्राधान्यानं घेणं अपरिहार्य असेल.

2015 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत स्वतंत्ररित्या लढले होते. त्यामुळे एकमेकांवरील टीकांमुळे ही निवडणूक प्रचंड गाजली होती. आताही शिवसेना आणि भाजप वेगळे झालेत. त्यात नवी समीकरणंही राज्यात जुळली आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत काय समीकरणं तयार होतील का, की शिवसेना स्वबळावर लढवेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अधिक वाचा  अंबादास दानवे यांना पक्षात घेण्यासाठी भाजप-शिंदे गटाकडून फोनवर फोन…; दानवेंची भूमिका काय?

5) पुणे महापालिका

राज्यातल्या आर्थिक आणि शहर नियोजनाच्या दृष्टीने मोठ्या महापालिकांमधील एक म्हणजे पुणे महापालिका आहे.

2022 च्या 14 मार्चला पुणे महापालिकेची मुदत संपली आहे. त्याआधी ही निवडणूक होणं अपेक्षित होते. 162 जागांच्या पुणे महापालिकेत सध्या भाजपची एकहाती सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे पक्षही पुणे महापालिकेत महत्वाचे आहेत.

6) पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च 2022 रोजी संपणार आहे. त्यामुळे या तारखेच्या आधी निवडणूक होणं अपेक्षित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण 128 जागा आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपची ताकद असलेल्या या महापालिकेत सध्या भाजप सत्तेत होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनंही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेऊन सत्ताधारी भाजपवर टीकाही केली होती. त्यामुळे यावेळी पिंपरी चिंचवड निडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची प्रतिष्ठ पणाला लागणार आहे.

7) नाशिक महापालिका

122 जागांच्या नाशिक महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. 2017 ला शेवटची निवडणूक इथं झाली होती. त्यामुळे 14 मार्च 2022 रोजी या महापालिकेची मुदत संपणार आहे.

2017 आधी पाच वर्षे या महापालिकेत मनसेची सत्ता होती. मनसेचा राज्यातील पहिला महापौरही नाशिकमध्येच बनला होता. मात्र, 2017 साली मनसे 40 वरून थेट 5 जागांवर आली.

नाशिक महापालिकेत सध्या भाजप एकहाती सत्तेत आहे. मात्र, इथं मनसेसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही महत्त्वाचे स्पर्धक आहेत. राज्यातल्या चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये नाशिक महापालिकेचा समावेश होतो.

8) औरंगाबाद महापालिका

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक 2015 साली झाली होती. त्यामुळे या महापालिकेची पाच वर्षांची मुदत 28 एप्रिल 2020 रोजीच संपली होती.

2020 मध्ये कोरोनाच्या भीतीमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आणि आता 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकांसोबत ही निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

शिवसेनेची सत्ता असलेल्या या निवडणुकीत 2015 साली भाजप आणि एमआयएमनं लक्षणीय जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष राज्यास्तरावरचा महाविकास आघाडीचा पॅटर्न इथं राबवणार का, की स्वबळावर लढणार, हेही या निवडणुकीत महत्वाचं ठरेल.

9) नागपूर महापालिका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरातील 151 जागांच्या महापालिकेत भाजप 108 जागांसह एकहाती सत्तेत आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीही इथं लढते.नागपूर महापालिकेची मुदत 4 मार्च 2022 रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे नागपुरात फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणूक होणं अपेक्षित आहे.

अधिक वाचा  नवनीत राणांच्या विरोधात आमदार बच्चू कडूंची नवी खेळी, मोठ्या उमेदवाराची करणार घोषणा ?

नागपुरातील महापालिका निवडणूक भाजपच प्रतिष्ठेची राहिल्यानं आणि तशाप्रकारे जिंकलीही आहे. मात्र, यावेळी राज्यातील महाविकास आघाडीची समीकरणं इथं वापरल्यास निवडणुकीतली चुरस वाढण्याची शक्यताही आहे.

10) पनवेल महापालिका

2016 साली पनवेल महापालिकेची निर्मिती झाली. त्यानंतर 2017 साली पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत 78 जागांपैकी 51 जागांवर विजय मिळवत भाजपनं एकहाती सत्ता स्थापन केली होती.

भाजपचे प्रशांत ठाकूर हे या भागातले मोठे नेते असून, समोर शेतकरी कामगार पक्षाचं आव्हान आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद इथं नसली, तरी काही वॉर्डांमध्ये मतांची टक्केवारी महत्वाची ठरणारी आहे. पनवेल महापालिकेची निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी पुढच्या सहा महिन्यांनी निवडणुका होणं अपेक्षित आहेत. कारण 9 जुलै 2022 रोजी या महापालिकेची मुदत संपणार आहे.

11) वसई-विरार महापालिका

27 जून 2020 रोजी मुदत संपली आहे. कोरोनामुळे इथे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे येत्या काही महिन्यात निवडणुका झाल्यास या महापालिकेच्या प्राधान्यानं निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

12) कोल्हापूर महापालिका

15 नोव्हेंबर 2020 रोजीच कोल्हापूर महापालिकेची मुदत संपली आहे. मात्र, कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे येत्या काही महिन्यात कोल्हापुरात निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

उर्वरीत महापालिकांची मुदत या दिवशी संपतेय?

13) भिवंडी-निजामपूर महापालिका – 8 जून 2022 रोजी मुदत संपतेय.

14) उल्हासनगर महापालिका – 4 एप्रिल 2021 रोजी मुदत संपली.

15) मीरा-भाईंदर महापालिका – 27 ऑगस्ट 2022 रोजी मुदत संपतेय.

16) नांदेड महापालिका – 31 ऑक्टोबर 2022 रोजी मुदत संपतेय.

17) सोलापूर महापालिका – 7 मार्च 2022 रोजी मुदत संपली.

18) परभणी महापालिका – 15 मे 2022 रोजी मुदत संपतेय.

19) अमरावती महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपली.

20) चंद्रपूर महापालिका – 28 मे 2022 रोजी मुदत संपतेय.

21) अकोला महापालिका – 8 मार्च 2022 रोजी मुदत संपली.

22) मालेगाव महापालिका – 13 जून 2022 रोजी मुदत संपतेय.

23) अहमदनगर महापालिका – 27 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपतेय.

24) धुळे महापालिका – 30 डिसेंबर 2023 रोजी मुदत संपतेय.

25) जळगाव महापालिका – 17 सप्टेंबर 2023 रोजी मुदत संपतेय.

26) सांगली-मिरज महापालिका – 19 ऑगस्ट 2023 रोजी मुदत संपतेय.

27) लातूर महापालिका – 21 मे 2022 रोजी मुदत संपतेय.