पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेपासूनच चर्चेत आहे. पण त्याचसोबत आणखी एका व्यक्तीची चर्चा आहे. ही व्यक्ती म्हणजे मनसे नेते वसंत मोरे. राज ठाकरेंच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि वसंत मोरेंच्या संदर्भात घडलेल्या घडामोडींमुळे वसंत मोरेंकडे राज्याचं विशेष लक्ष आहे. नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, त्यामुळे ते चर्चेत आहेत.

वसंत मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी “निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू ” श्रीमंतयोगी” असं कॅप्शनही दिलं आहे. या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. या कमेंट्समधून अनेकजण वसंत मोरेंवर नाराज असल्याचं दिसत आहे.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यावरून पुण्याच्या मनसे शहराध्य़क्षपदी असलेल्या वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोनच दिवसांत वसंत मोरे यांचं शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं. आपला कार्यकाळ संपल्याचं कारण यावेळी मोरेंनी दिलं. मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्यानेच पद गेल्याची चर्चा होती.

पुढे १ मेच्या सभेआधी राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातही वसंत मोरे कुठेच दिसले नाहीत. तब्येत बरी नसल्याचं कारण दिलं. पण याच दौऱ्यादरम्यान, एका सहकाऱ्याच्या घरी इफ्तार पार्टीला गेल्याचा फोटो मोरेंनी शेअर केला. त्यानंतर आपण औरंगाबाद सभेला जात असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. आणि आता, जेव्हा मशिदींवरील भोंग्यांच्या बाबतीत मनसेकडून राज्यात आक्रमक पवित्रा घेतला जात असताना वसंत मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतानाचा फोटो शेअऱ केला आहे.

अधिक वाचा  उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे कसाबशी संबंध ,सोमय्यांचा आरोप

अनेकजणांनी याच पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त केली आहे. वसंत मोरे लवकरच मनसे सोडणार, असं अनेक जणांना वाटत आहे. तर तात्या, काहीतरी चुकतंय, राजसाहेबांची साथ सोडू नका, जे कराल ते पक्षाच्या हिताचे असावे, साहेबांवर आणि पक्षावर संकट असताना त्यांना लढाईच्या मैदानात सोडून जाऊ नका, पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, अशा आशयाच्या शेकडो कमेंट्स वसंत मोरेंच्या या फोटोवर आल्या आहेत.