मुंबई : नवनीत राणा  यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असं पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणांची प्रकृती खालावली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

नवनीत राणा यांना स्पॉंडिलायसिसचा आजार आहे. तुरुंगात आणले तेव्हापासून त्यांना जमिनीवर झोपायला लावले आहे. त्यामुळे त्यांचा आजार बळावला आहे. आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली. पण, आमच्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल, असं पत्र नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं. तसेच या अर्जाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देखील पाठविण्यात आली होती. राणांच्या वकिलांनी कोर्टात देखील या आजाराबाबत माहिती दिली होती. नवनीत राणांच्या कंबरेचं दुखणं वाढलं असून त्यांना उपचारासाठी गरज आहे, असं वकिलांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अधिक वाचा  अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार नवनीत राणा मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाजविण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर रोखले होते. शेवटी राणा दाम्पत्यांनी अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यांना जेल मिळते की बेल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.