पिंपरी, पुणे  : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (PCET) संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE) पुणे येथील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी (IT) ब्रांचचा विद्यार्थी राहुल बडगुजर याला “डाटा इनसाइट्स”  या जागतिक नामांकित कंपनीने वार्षिक ३६ लाख पॅकेजची नोकरी दिली आहे. राहुलची डाटा इनसाइट्स कंपनीकडून ‘सॉफ्टवेअर  इंजिनिअर’ या पदासाठी निवड झाल्याची माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे व पीसीईटी – नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.
राहुल हा नाशिक मधील सर्वसामान्य कुटुंबातील आहे. राहुलच्या वडिलांचे सिन्नर तालुक्यातील मालेगाव येथे सायकल रिपेअरिंगचे दुकान आहे. राहुलची आई एमआयडीसी मधील छोट्या कंपनीत कामाला जाते, त्याचा भाऊ खासगी वाहनांवर चालक आहे. कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर आपण प्रतिकुल परिस्थितीमधून देखील मोठं यश मिळवू शकतो हे राहुलने दाखवून दिलं आहे. राहुलच्या या यशाबद्दल त्याचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पीसीईटी- नूतन ग्रुपच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबरच रोजगारक्षम बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी राहुलच्या सत्कार प्रसंगी दिली.
अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या ऑनलाईन प्रोग्रामिंगच्या स्पर्धांमध्ये मी नियमित भाग घेत होतो. अभ्यासक्रमातील विषयांव्यतिरिक्त इंटर्नशिप केल्यामुळे कंपनीतल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने माझे प्रॅक्टिकल ज्ञान वृद्धिंगत झाले. शिकत असतानाच एका अमेरिकन कंपनीत गेली दीड वर्ष ऑनलाईन इंटर्नशिप केल्याचा मला खूप फायदा झाल्याचे तसेच प्रत्येक महिन्याला ८०,००० रुपये स्टायपेंड मिळत असल्याचे राहुलने सांगितले.
पीसीईटी – नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतर्फे दरवर्षी ३५० कंपन्यांमध्ये मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. त्यातूनच अंतिम वर्षातील २०२२ बॅचमधील पीसीईटी – नूतन ग्रुपच्या १,५८७ विध्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १,५४३ जॉब ऑफर्स मिळाले आहेत अशी माहिती सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली.
यावर्षी पीसीईटी, नूतनच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्यांचा आलेख उल्लेखनीय आहे. यामधे ७ लाखांपेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या ४३७; ५ ते ७ लाखांमधील नोकऱ्या ४६०; ३.५ ते ५ लाखांमधील नोकऱ्या ५८३ तसेच ३.५ लाखांपेक्षा कमी पगाराच्या ६३ नोकऱ्यांचा समावेश आहे. तसेच पीसीईटी नूतनच्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांना काही नामांकित कंपन्यांनी देखील नोकऱ्या दिल्या आहेत. यामधे कॅपजेमिनी : ३४८, कॉग्निझंट : ३०७, विप्रो : २६७, ॲक्सेंचर : १२५ या कंपन्यांचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकीतून बेरोजगार युवकांना मदत करण्याच्या हेतूने पीसीईटी – नूतनच्या सेंट्रल प्लेसमेंट सेल तर्फे आतापर्यंत संपूर्ण भारतातील सुमारे १२,००,००० (१२ लाख) बेरोजगार युवकांनी विविध कॅम्पसमध्ये नोंदणी केली आहे. या प्रयत्नातून गेल्या काही वर्षात सुमारे २५,२२० पेक्षा जास्त बेरोजगारांना नोकरी मिळवून दिल्याची माहिती प्रा. रवंदळे यांनी दिली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, आयटी विभागप्रमुख डॉ. सोनाली पाटील तसेच सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. राहुल डिग्गे, प्रा. केदार भोगशेट्टी, प्रा. पूनम रोकडे, मंगेश काळभोर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राहुल बडगुजरचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा  नागपूरमध्ये शिवसेनेला भीती राजकीय ‘गेम’ होण्याची