पुणे –सिंहगडावरील प्रदूषण कमी करण्यासह वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ई-बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी सर्व खासगी वाहनांना गडवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.मात्र, ज्यांच्याकडे ई-बाईक अथवा ई-कार असतील, त्यांना गडावर वाहने घेऊन जाण्यास मुभा दिली जाण्याची शक्‍यता आहे.

पीएमपी प्रशासन आणि वनविभागात याबाबत चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली. खासगी ई-बाईकमुळे कोणतेही प्रदूषण होणार नाही. यामुळे हा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनापासून सिंहगडावर जाण्यासाठी पीएमपीने ई-बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून चार ई-बस त्यासाठी देण्यात आलेल्या आहेत. या बसेसचे अद्याप वेळापत्रक नसून प्रवासी संख्येनुसार त्या सोडण्यात येत आहेत. मात्र, उन्हाळी सुट्टीमुळे गडावर गर्दी असली तरी पावसाळ्यात ही गर्दी वाढून बस सेवेवर ताणही येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ई-वाहनांना मुभा दिली जाण्याची दाट शक्‍यता आहे.

अधिक वाचा  अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी

सिंहगडावर खासगी ई-वाहनांना प्रवेश देण्याबाबत वन विभागाशी चर्चा सुरू आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बस सुरू करण्यात आलेल्या आहे. ई-बाईक आणि ई-कारचा उद्देशही प्रदूषण कमी करण्यासाठीच वापर होतो. त्यामुळे दोन्हीचे उद्देश समान असल्याने या खासगी वाहनांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल.