पुणे : राज्यातील शहरी भागांमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांवर आता ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’च्या (म्हाडा) तांत्रिक कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. गृहप्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आणि विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी तांत्रिक कक्षाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. खासगी भागीदारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए), ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) आणि ‘सिडको’ यापैकी कोणत्याही प्राधिकरणाकडून उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमधील सदनिकांची तपासणी आता ‘म्हाडा’च्या तांत्रिक कक्षाकडून केली जाणार आहे.

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेची जून २०१५मध्ये मुहूर्तमेढ रोवली. आता योजनेला केंद्राने मुदतवाढही दिली आहे. योजनेंतर्गत शहरी भागातील गृहप्रकल्प ‘म्हाडा’सह अन्य स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणांकडून उभारण्यात येतात. योजनेला गती देण्यासाठी; तसेच तिच्यावर नियंत्रण ठेवणे आणि प्रस्ताव सादर करताना सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने प्रचलित कार्यपद्धतीत बदल केला आहे.

अधिक वाचा  धक्कादायक! पुण्यात वनाज मेट्रो कारशेडच्या कामादरम्यान ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

सद्य परिस्थितीत पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पांना ‘म्हाडा’कडून मान्यता मिळते. या प्रकल्पांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आणि देकार पत्रे दिली जातात. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर प्रकल्पांवर ‘म्हाडा’चे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्व परवानग्या आणि तपासणीचे अधिकार ‘म्हाडा’च्या तांत्रिक कक्षाला देण्याचा निर्णय राज्य सरकारकडे घेतला आहे.

पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

या योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांची गुणवत्ता योग्य आहे किंवा कसे, याची तपासणी म्हाडाच्या तांत्रिक कक्षामार्फत केली जाणार आहे. त्यासाठी या कक्षाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या कक्षामध्ये आता एक मुख्य अभियंता, दोन कार्यकारी अभियंते, दोन उप अभियंते यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गृहप्रकल्पावर नियंत्रण; तसेच सदनिकांची तपासणी केली जाणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.