मुंबई : “राज ठाकरे यांच्या भाषणाबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त तपास करुन आवश्यक कारवाई आजच करतील. कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे,” अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेठ बोलत होते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या भाषणाचा पोलीस आयुक्तांना अभ्यास केला आहे. आवश्यक वाटल्यास पोलीस आयुक्त आजच राज ठाकरेंवर कारवाई करतील, असं रजनीश सेठ यांनी म्हटलं.

अधिक वाचा  मोदी सरकारची 8 वर्षं: नोटाबंदी ते लॉकडाऊन, 'या' निर्णयांचा कसा परिणाम झाला?

CRPF च्या 87 कंपन्या, 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात : पोलीस महासंचालक

“कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालकांनी केलं. ते पुढे म्हणाले की,”कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत.”

मुख्यमंत्री-गृहमंत्री यांच्यातील बैठकीत राज ठाकरे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा : सूत्र

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यातील बैठकीत राज ठाकरे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर आज संध्याकाळपर्यंत कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या वरिष्ठ पातळीवर कशाप्रकारे कारवाई होऊ शकेल याबाबात गृहखात्यात खलबतं सुरु आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अधिक वाचा  कंगना रणौतचा बहुचर्चित ‘धाकड’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला‘, भुल भुलैय्या २’ ठरला सरस..

मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.