छोट्या पडद्यावर यंदा ‘बिग बॉस मराठी’चं  तिसरं पर्व चांगलंच गाजलं. दरवेळी टास्कमुळे चर्चेत येणारा हा शो यावेळी घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे चर्चेत राहिला.

जय,मीरा,उत्कर्ष, विशाल, विकास, सोनाली, मीनल हे स्पर्धक तर शो संपल्यानंतरही सातत्याने चाहत्यांच्या चर्चेत येत आहेत. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या अनेक स्पर्धकांना या शोमध्येच नवनवीन प्रोजेक्ट्सच्या ऑफर मिळाल्या. यातलंच एक नाव म्हणजे जय दुधाणे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेवेळी जयला दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका चित्रपटाची ऑफर दिली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर आणखी एक नवा कोरा सिनेमा त्याच्या पदरात पडला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

बिग बॉसच्या घरात असताना जयला महेश मांजरेकरांनी त्यांच्या ‘शनिवार वाडा’ या आगामी चित्रपटाची ऑफर दिली. या ऑफरनंतर तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला. विशेष म्हणजे आता तो लवकरच ‘गडद’ या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नेहा महाजन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

मध्यंतरी जय आणि नेहा या दोघांचे मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहिल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या फोटोंमागील सत्य आता समोर आलं आहे. नेहा आणि जय गडद या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मालदीवला गेले होते. येथे या चित्रपटाचं पहिलं शुटिंग शेड्युल पार पडलं आहे.

अधिक वाचा  या लिखाणाला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही, राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले

‘गडद’ हा चित्रपट स्कूबा ड्रायव्हिंगवर आधारित आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच अशा चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे. त्यामुळे अंडरवॉटर शूट केलेला हा सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

दरम्यान, या चित्रपटात जय आणि नेहासह मराठी कलाविश्वातील आणखी काही दिग्गज कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वराह सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या प्रज्ञेश कदम यांनी उचलली आहे.