मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते म्हणून भाजपनं त्यांना वारंवार फसवलं, हे मी डोळ्यानं पाहिलंय, अशा शब्दांत भाजपच्या आरोपांना उद्धव ठाकरे यांनी नुकतचं उत्तर दिलं होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “खरंच बाळासाहेब भोळे होते त्याचाच फायदा घेऊन तुम्ही कार्याध्यक्ष झालात, नाहीतर आयुष्यभर फोटोच काढत बसला असता”

“सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही” या भाजपच्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे म्हणाले, माझ्यावर नेहमीच आरोप होतो की सध्याची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. यावर मी हेच म्हणेन की, होय हे बरोबर आहे. कारण बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते. त्यामुळं भाजपनं त्यांना वेळोवेळी कसं फसवलं हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

भाजप फसवी असल्यानं मी थोडासा धुर्तपणे वागतो आहे. माझे वडील भोळे होते पण मी भोळा नाही. हिंदुत्वाच्या आडून भाजप आपला डाव साधत होता. याकडे बाळासाहेबांनी कानाडोळा केला. पण मी तसं करणार नाही. आमचा कारभार जर वाईट असेल तर आम्हाला जरूर जनतेसमोर उघडं पाडा पण सुडबुद्धीचं राजकारण चालणार नाही. हा विकृतपणा तुमच्या रक्तात आला कुठून? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.