मुंबई: काल भाजपच्या बुस्टर डोस सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीदीवरुन शिवसेनेवर टीका केली होती. बाबरी मशीद पाडण्यासाठी राज्यातून एकही शिवसेनेचा नेता नव्हता असा आरोप काल फडणवीस यांनी केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. बाबरीच्यावेळी शिवसेना कुठे होती हे तुमच्या नेत्यांना विचारा, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. काल औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी भोंग्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, भोंग्याचा विषय हा कायद्याच्या चौकटीतील आहे. भोंग्याचा मुद्दा काढून मुळ विषयाला बाजूला ठेवण्याचे काम चालू आहे. हे काम काही लोकांकडून भाजप करत असल्याची टीका राऊत यांनी केली.

अधिक वाचा  रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

देशातील मुळ प्रश्नावरुन लक्ष वळवण्यासाठी भाजप  प्रयत्न करत आहे. देशात भोंग्यापेक्षा महत्वाचे विषय आहेत. भोग्याचा विषय हा कायद्याच्या चौकटीतील आहे. तुम्हाला आता काहीच काम नसल्यामुळे तुम्ही हे करत आहात, हे राष्ट्रीय एकत्मतेला मारक असल्याचे राऊत म्हणाले.

महाराष्ट्र हे लेचापेच्याचे राज्य नाही. गृहमंत्री, मुख्यमंत्री कारवाई करतील. रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला आहे, रावणाचा इतिहास त्यांनी वाचावा. काही लोकांना सत्ता गेल्यामुळे अहंकार झाला आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.