मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला काही क्षण बाकी असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरे जिथे जातात तिथे मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचा भगवी शाल देऊन सत्कार केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची भगवी शाल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शालीवरूनच राज यांच्यावर टीका केली आहे. आज या कार्यक्रमाला आलो. मला वाटलं तुम्ही भगवी शाल द्याल. पण तशी काही आवश्यकता नाहीये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. छत्रपती शिवाजी राज म्हटल्यानंतर वैभवाचं दर्शन घडलंच पाहिजे. राकट देशा म्हटल्यानंतर राकटपणा त्या शिल्पात दिसलं पाहिजे. शिवरायाचं दर्शन आपल्याला दिसतं. जे परदेशातून येतात त्यांना हे शहर काय आहे? या शहराची ओळख काय आहे? हे कळलं पाहिजे. विमानतळावर उतरल्यानंतर मुंबादेवीचं दर्शन घडतं. तिला वंदन करून तिच्या मुंबईत नगरीत या, असं ते म्हणाले. तसेच बाकी बोलायचं ते १४ तारखेलाच बोलेल. मला वाटलं आज भगवी शाल द्याल. पण तशी आवश्यकता नाहीये, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

अधिक वाचा  अमित शाह यांचा 'तो' फोटो व्हायरल केल्यामुळे बॉलीवूड दिग्दर्शकाला पडलं महागात, गुन्हा दाखल

किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेश मार्गावरील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे, किल्ले शिवनेरीची कायमस्वरुपी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. देशाच्या आर्थिक राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगासाठी मुख्य प्रवेशद्वारच आहे. त्यामुळे जगाला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी म्हणुन विमानतळाच्या प्रवेश मार्गावर महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. आता याच पुतळ्याच्या मागे किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृती कायमस्वरुपी उभारण्यात आलीय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परीसरास भव्य दिव्यतेचा साज चढला आहे. मुंबई विमानतळावर प्रवेश करताना आणि पश्चिम एक्सप्रेस वे वरून जाताना या भव्य दिव्य प्रतिकृतीचे दर्शन मुंबईकरांनाही करता येणार आहे. भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितलेत.

अधिक वाचा  शिरूर-हवेलीतील पाच गावांसाठी लवकरच ‘गूड न्यूज’! ; आमदार अशोक पवारांची मागणी मान्य

दरम्यान, आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्तेला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे हे सभागृहात सुध्दा मी बोललेलो आहे. आता नवीन नवीन हे करुन बघू ते करुन बघू करणारे आहेत. मार्केटिंगचा जमाना आहे, तुम्हाला नाही पसंत पडले तर परत करा. तस हे तुम्हाला फळल तर फळल नाहीतर परत. गाजराची पुंगी वाजली तर वाजली हे असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितलेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

हिंदूना समजत नाही अस समजू नका. तुम्ही मी हिंदूच. आपल्या देशात हिंदू हे अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी मग इतरांना हाकलून द्यायच, ते फसलं की मग आम्ही हिंदू. ह्याला माकडचाळे म्हणतात त्यामुळे आपल्या जनतेला ते समजतंय, असंही ते म्हणाले.