औरंगाबाद : रमजान ईद दोन दिवसांवर असतांना राज ठाकरे यांच्या सभेला गृहमंत्रालयाने परवानगी दिलीच कशी? हे खाते राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे आहे, पण या मागे राजकारण असून राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाला मोठं करून शिवसेनेला कुमकूवत करण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या औंरगाबादेतील सभा आणि मशिदीवरील भोंग्यावर आतापर्यंत भ्र शब्द न काढणाऱ्या एमआयएमने अचानक आक्रमक भूमिका घेतली आहे. इम्तियाज यांच्या इफ्तार पार्टीला एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी काल हजेरी लावली.

अधिक वाचा  सातारा लोकसभा पुन्हा टिवस्ट; निवडणूक लढण्यास नकार; 5 पैकी कुणाला उमेदवारी? नवी चर्चा सुरु

त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनीही थोडक्यात का होईना, पण राजसभेवर भाष्य केले होते. आज राज ठाकरेंच्या सभेला काही मिनिटे शिल्लक असतांना इम्तियाज जलील यांनी शरद पवार व राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, राष्ट्रवादी काॅंग्रेसला राज्यातल नंबर एकचा पक्ष व्हायचे आहे. त्यासाठीच राज ठाकरे व त्यांच्या मनसेला मोठं करण्याचा प्रयत्न शरद पवार हेच करत आहेत. रमझान ईद तोंडावर असतांना राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळतेच कशी?

राष्ट्रवादीकडे गृहखाते आहे आणि त्या खात्यानेच राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली. शरद पवारांचे हे राजकारण असून त्यांना राज्यात शिवसेनेला कमकुवत करायचे आहे हे स्पष्ट आहे. परंतु राष्ट्रवादीच्या या घाणेरड्या राजकारणात औरंगाबादच्या जनतेला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला.