तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईत सोमय्या मैदान इथं सुरू असलेल्या ‘बुस्टर डोस’ सभेत बोलत होते. ही पोलखोल सभा नाही. खरी पोलखोल सभा तर मी 14 मे नंतर घेणार आहे, असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बाबरी ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं. बाबरी ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस ढाचा पाडायच्यावेळे तेथे होता. जेलमध्ये गेलो, आम्ही लाठीगोळी खाण्याचं काम केलं.”
“बाबरी पडली तेव्हा शिवसेनेतला एकही नेता हजर नव्हता.””बाबरीच्या खटल्यात 32 आरोपी होते त्यात एकही शिवसेनेचा नेता नव्हता. काही लोकांना वाटतं आपण म्हणजेच महाराष्ट्र आहे असं वाटतं, त्यांना मी नम्रपणे सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे अठरापगड जातीच्या लोकांनी तयार झालेला महाराष्ट्र अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली.”मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे. कारण आपल्याला मुंबईकरांसाठी संघर्ष करायचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही मुंबई आम्ही त्यांच्या हाती दिली होती. आता मुंबईला माफियांच्या हातातून काढायचं आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
यासभेला भाजपाचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, प्रसाद लाड, अतुल भातखळकर असे अनेक नेते या सभेसाठी उपस्थित होते.
तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या?
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. हनुमानचालिसा म्हणण्याचा मानस व्यक्त केल्यामुळे सरकार उलथवण्याचा डाव होता असं सरकारनं सांगितलंय. पण हनुमानचालिसेमुळे रामाचं सरकार जाईल की रावणाचं? मग तुम्ही रावणाच्या बाजूचे आहात की रामाच्या हे सांगा असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला. पत्रकारांनी विरोधात लिहिलं की त्यांच्यावर कारवाई होते. कोणीही विरोधात बोललं की त्यांच्यावर कारवाई होते. एकप्रकारची अघोषित आणीबाणी लागली आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
“या सरकारला बेवड्यांचा केवढा पुळका आहे. बेवड्यांना इंग्रजी दारू परवडत नाही म्हणून टॅक्स कमी केला. अरे करा ना पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स कमी नाही केला. परवा मंत्रिमंडळाच्या निर्णयावेळी नवाब मलिकांचा फोटो छापला. मुख्यमंत्र्यांचं वर्क फ्रॉम होम माहिती होतं. आता वर्क फ्रॉम जेल सुरू झालंय का?”
“मुख्यमंत्री भाजपावर तुटून पडा असं सांगतात, पण आमच्या अंगावर आलात तर तुटालही आणि पडालही. आमच्या अंगावर येणाऱ्याला उत्तर देऊ”, असं फडणवीस यांनी सांगितलं. गेले काही दिवस मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी पोलखोल अभियान चालवत आहे. मुंबई महानगरपालिकेची मुदत संपून नव्या निवडणुका होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यातील स्पर्धा आतापासून सुरू झाल्याचं दिसत आहे.
नव्वदच्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांना तसा घरातून राजकारणाचा वारसा होताच. देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे नेते होते. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभाताई फडणवीस देवेंद्र फडणवीसांच्या काकू. नव्वदच्या दशकात नागपूरचे महापौरपद सांभाळल्यानंतर ते 1999 मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी प्रशासकीय कामकाजाचा त्यांचा अनुभव केवळ महापौरपदापुरता मर्यादित होता. त्यांनी कुठलेही मंत्रिपद सांभाळले नव्हते. नागपूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली, तेव्हा नागपुरात आणि विदर्भात भाजपचे सर्वेसर्वा नितीन गडकरी होते. त्यांचेच बोट धरून फडणवीसांनी सुरुवातीची वाटचाल केली.
पुढे फडमात्र भाजपमधील बदलत्या समीकरणांमध्ये फडणवीसांनी गडकरींचे बोट सोडून त्यांचे विरोधक गोपीनाथ मुंडे यांचा हात पकडला. याच गटाबरोबर राहून फडणवीसांना 2013 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यात यश आलं. 2014 साली ते मुख्यमंत्री झाले आणि 2019 साली महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ते विरोधी पक्षनेते झाले.