सोलापूर : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. इतकंच नाही तर राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीवादाचे गंभीर आरोप केले आहेत. शरद पवार यांनी राज्यात जातीपातीचं राजकारण केल्याचा घणाघात राज यांनी केलाय. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली जातेय, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत राज ठाकरेंचा उल्लेख भाजपचा बोलका बाहुला असा केला होता. तर आज सोलापुरात बोलताना मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख उपटसुंभ असा केलाय! माढा तालुक्यातील अरण येथे सावता परिषद आयोजित माळी समाजाच्या मेळाव्यात मुंडे बोलत होते.

अधिक वाचा  राज्यातही ओबीसींना आरक्षण; बांठिया समितीचे काम अंतिम टप्प्यात - अजित पवारांची ग्वाही

उपटसुंभ्याला महत्व देऊ नका

धनंजय मुंडे म्हणाले की महापुरुषांना जातीत वाटून टाकलं आहे. केंद्राच्या विरोधात लाव रे ती सीडी म्हणणारे, आता त्यांच्यात बरेच बदल झाले आहेत. हनुमान चालिसा मंदिरासमोर लावा म्हणा, कुणाच्याही घरासमोर नको. उपटसुंभ्याला महत्व देऊ नका. कोप लागेल तुमच्या मागे हनुमानाचा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केलीय.

भाजपचा बोलका बाहुला म्हणूनही उल्लेख’

मुंडे यांनी यापूर्वी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेतही राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुंडे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांचा अर्धवटराव असा उल्लेख केलाय. पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा शब्दात मुंडे यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला. माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली होती.

अधिक वाचा  आम्ही कोणाला छेडणार नाही. पण कोणी आम्हाला छेडले तर... राजनाथ सिंह यांचा इशारा

शरद पवारांचाही राज ठाकरेंवर पलटवार

‘सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आज टेलिव्हिजनवर काही दिवस काय बघतोय तर कुणाची सभा आहे, हे करणार ते करणार, हनुमानाच्या नावाने करणार, आणखी कुणाच्या नावाने करणार, या सगळ्या चर्चा, मागण्या याने बेकारीचा प्रश्न, भुकेचा प्रश्न सुटणार आहे का? तुमच्यावर पिढ्यानपिढ्या होणारा अन्याय सुटणार आहे का? असा सवाल करतानाच मुळ प्रश्नाला बगल देऊन भलत्याच गोष्टींकडे समाजाला वळवून स्वतःचा स्वार्थ साधत काही घटकांनी निकाल घेतला आणि त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते’, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.