शुक्रवारी पटियाला येथे खलिस्तान मुर्दाबाद मोर्चादरम्यान शिवसेना कार्यकर्ते आणि खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. पंजाबमधील पटियाला येथे शुक्रवारी दुपारी मिरवणुकीवरून दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला.

शुक्रवारी शीख फॉर जस्‍टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पुन्नूने खलिस्तान स्थापना दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. शिवसेनेनेविरोधात पटियाला येथे खलिस्तानी मुर्दाबाद मार्च काढण्याची घोषणा केली होती. त्यांतर शिवसैनिक देखील चांगलेच आक्रमक झाले.

शुक्रवारी दुपारी शिवसेनेने मोर्चा काढला. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि खलिस्‍तानी समर्थकांमध्‍ये तुफान हाणामारी झाली. दगड आणि तलवारीच्‍या वापरामुळे परिसरात प्रचंड तणाव वाढला. सकाळी ११ ते दुपारी तीनपर्यंत हा धिंगाणा सुरु होता. या घटनेनंतर शिवसेनेच्या कार्यकारी अध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

अधिक वाचा  श्रीगोंद्यात 'नंबर -वन' साठी कुरघोडी; ३ या घराण्यांमध्ये जुंपण्याची शक्यता

काल पंजाब शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोठा वाद झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा यांनी त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून मोर्चा काढणाऱ्या कार्यकारी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंगला यांना निलंबित करण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पतियालामध्ये रात्री साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अफवा पसरू नयेत यासाठी पंजाब सरकारच्या गृह विभागाने आदेश जारी केले असल्याचं समजतं आहे.