औरंगाबादमध्ये 1 मे रोजी घेतलेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी विषयी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीमधील मंत्र्यांसह, संभाजी ब्रिगेड आणि इतिहास लेखकांनी राज ठाकरेंच्या या विधानाचं खंडन केलं आहे. औरंगाबादमध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “रायगडावरची शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना तुम्ही आता ब्राम्हण म्हणून बघणार आहात का?”

राज ठाकरे यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी राज ठाकरे हे खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. “शिवाजी महाराजांची समाधी ही त्यांच्या निधनानंतर शंभुराजांनीच बांधून ठेवली होती. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. लोकमान्य टिळकांनी1885 पासून या समाधीच्या जिर्णोध्दारासाठी फंड उभा केला. 1895 ते 1920 दरम्यान एक साधी वीटही त्यांनी रचली नाही. तो फंड डेक्कन बॅंकेत ठेवला होता. त्या समाधीचे नकाशेही उपलब्ध आहेत. महात्मा फुले त्यावेळी तिथे गेल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी जे सांगितले आहे ते धादांत खोट आहे,” असं इंद्रजित सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

इंद्रजित सावंत यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास सांगणारं ‘शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध’ हे पुस्तक लिहिलं आहे. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची बिकट अवस्था महात्मा ज्योतीबा फुले यांनी समोर आणल्याचा नोंद असल्याचंही इंद्रजित सावंत यांनी म्हटलं आहे. “1926 साली लोकांचा दबाव वाढला. त्यानंतर ब्रिटीशांनी पुढाकार घेऊन समाधीचं काम पूर्ण झालं. त्यामुळे राज ठाकरे जे सांगत आहेत की, टिळकांनी जिर्णोध्दार केला ते चुकीचं आहे,” असं सावंत म्हणाले.

अधिक वाचा  रिहे येथे ग्रामस्थांना सनदांचे वाटप

तर मविआ सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीसुद्धा नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे हे धादांत खोटं बोलत असल्याचा दावा केला आहे. राज ठाकरे यांनी इतिहास तपासून पाहावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे. “माहात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. हे सगळे उल्लेख त्यांच्याच ‘दीनबंधू’ या वर्तमानपत्रात आले आहेत. राज ठाकरे असं चुकीचं का बोलत होते? इथे फुले, शाहू आंबेडकरांनाही तुम्ही दूर सारणार आहात का?,” असं छगन भुजबळ म्हणाले.

लोकमान्य टिळकांनी समाधीसाठी निधी उभा केला, पण वापरला नाही यावर त्यांनीच स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या मंडळाकडून शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार झाल्याचं मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंची तोफ धडाडणार; पुण्यात अखेर रविवारी सभा निश्चित

तर रायगडावरच्या महाराजांच्या समाधीची दुर्दशा जेम्स डग्लस नावाच्या ब्रिटिश व्यक्तीने 1883 साली नोंदवली. त्याच सोबत गोविंद बाबाजी जोशी यांनी लिहीलेलं ‘रायगड किल्ल्याचे वर्णन’ हे पुस्तक 1885 मध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे अस्वस्थता पसरली. याचा परिणाम म्हणून 1885 साली रावबहादूर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे यांनी पुण्यात सभेचे आयोजन करुन समाधी जिर्णोध्दाराचं सुतोवाच केल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

लोकमान्य टिळक की महात्मा फुले? शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली?

“श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने 1895 साली झाली. प्रामुख्याने दोन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून ही स्थापना केली गेली. यातील पहिले म्हणजे गडावरील समाधीची व इतर वास्तुंची देखभाल, दुरूस्ती व जीर्णोध्दार आणि दुसरे म्हणजे शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम करणे, शिवचरित्राचा प्रचार, प्रसार करणे. आजतागायत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने अनेक विधायक कामं पुरातत्त्व खात्याच्या मर्यादा असतानाही केली आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं कार्य फक्त शिवपुण्यतिथी कार्यक्रमापुरतं मर्यादित नसून मंडळाने संपूर्ण रायगडाचे आणि गडावरील संपूर्ण वास्तूंचे जतन करण्यात यावे, याकरता स्वातंत्र्यपूर्व काळातही प्रयत्न केले होते आणि आजही ते चालू ठेवले आहेत,” असं सुधीर थोरात यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

अधिक वाचा  मोदी सरकारची 8 वर्षं: नोटाबंदी ते लॉकडाऊन, 'या' निर्णयांचा कसा परिणाम झाला?

समाधीच्या उभारणीत शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या योगदानाचे सगळ्या नोंदी उपलब्ध असल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्या वादात समाजात जातीय तेढ निर्माण होऊ नये अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.ज्येष्ठ लेखक आणि अभ्यासक रावसाहेब कसबे यांनी शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दोन विचारधारांमधला फरक ओळखण्याची सूचना केली आहे.”महात्मा फुले यांचा शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा शेतकऱ्यांचा, बहुजनांचा राजा असा आहे. तर टिळक त्यांच्याकडे गोब्राम्हणप्रतिपालक म्हणून बघतात. आताच्या परिस्थितीमध्ये जनतेपुढे असलेल्या असंख्य समस्यांवरून लक्ष हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असंही रावसाहेब कसबे म्हणाले. समाजाचे जातीय ध्रुवीकरण रोखलं पाहीजे असंही ते म्हणाले.

या वादात संभाजी ब्रिगेडने राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.