अहमदाबाद : गुजरातमधील पिपावाव बंदरातून ४५० कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. गुजरातचं दहशतवादविरोधी पथक आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी संयुक्त कारवाई करत पिपावाव बंदरावर एका कंटेनरमधून हेरॉईन जप्त केलं. हे ड्रग इराणमधून अमरेली जिल्ह्यातील पिपावाव बंदरात आणलं होतं. जप्त केलेल्या कंटनेरचं वजन सुमारे ९७८० किलोग्राम आहे. याचा तपास २८ एप्रिल रोजी केला होता. १०० जम्बो पिशव्यांमधील चार संशयास्पद पिशव्यांमध्ये ड्रग्ज सापडलं. कंटेनरमधून सुमारे ४५० कोटी रुपयांचे सुमारे ९० किलो हेरॉईन जप्त केलं आहे.

गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी शुक्रवारी (२९ एप्रिल) सांगितलं की, अंमली पदार्थांच्या तस्करी नेटवर्कने अधिकाऱ्यांना गुंगारा देण्याण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. धागा हेरॉईनच्या द्रावणात भिजवला आणि नंतर तो सुकवला. त्यानंतर त्याला गाठीचा आकार देत बॅगमध्ये पॅक केला. हा पिशव्या सामान्य दोऱ्याच्या गाठी असलेल्या इथर पिशव्यासोबत पाठवल्या, जेणेकरुन अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष जाऊ नये.

अधिक वाचा  कसला विश्वासघात? जागा सेनेचीच, उद्याच फॉर्म भरणार- राऊत

“धाग्याच्या मोठ्या पिशव्या असलेलं कंटेनर पाच महिन्यांपूर्वी इराणहून पिपावाव बंदरात आलं होते. सुमारे ३९५ किलो वजनाच्या धाग्याच्या चार संशयास्पद पिशव्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण केलं असता धागा अफू किंवा हेरॉईनमध्ये गुंडाळल्याचं स्पष्ट झालं. आम्हाला त्या धाग्यांमधून सुमारे ४५० कोटी रुपयांचे सुमारे ९० किलो हेरॉईन सापडलं आहे. एनडीपीएस कायदा, १९८५ च्या तरतुदींनुसार तपास आणि जप्ती सुरु आहे, असं डीआरआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

“डीआरआयने डिसेंबर २०२१ मध्ये हेरॉईन, कोकेन, चरस आणि सायकोट्रॉपिक पदार्थ यांसारखं ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केलं होतं. जानेवारीमध्ये ३,३०० किलोहून अधिक हेरॉईन, ३२० किलो कोकेन आणि २३० किलो चरस जप्त करण्यात आलं. याशिवाय १७० किलो स्यूडोफेड्रिन आणि ६७ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केलं होतं,” असं डीआरआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं. तर सप्टेंबर २०२१ मध्ये मुंद्रा बंदरावर ३,००० किलो हेरॉईन आणि कांडला बंदरातून एप्रिल २०२२ मध्ये २०५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं.