मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या काही वादग्रस्त आणि टीकायुक्त वक्तव्यांमुळे ओळखल्या जातात. अनेक विषयांना धरुन त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यही केली असल्यानं त्यांना ट्रोलही केलं गेलंय. शिवसेना किंवा महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर त्यांचा रोख असतो तर बऱ्याचवेळा त्यांच्या गाण्यांच्या प्रमोशनसाठी त्या सोशल मीडियावर झळकत असतात. दरम्यान, त्यांच्या याच खळबळजनक ट्विट्सवरून सध्या रोहीणी खडसे यांनी त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. रोहिणी खडसे यांनी अमृता फडणवीस यांना नाव न घेता राजकीय संस्कारांची कमी प्रकर्षाने जाणवते, असं म्हटंल आहे.

अधिक वाचा  बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, शिष्य कॅबिनेट मंत्री, पण दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवकही नाही..

यासंदर्भात खडसे यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्राच्या आजवर होऊन कार्यभार स्विकारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींची नावे लिहली आहेत. त्या म्हणतात, आज होत असलेली टिका टिप्पणी बघून स्व. वेणुताई चव्हाण, आदरणीय प्रतिभाताई पवार, आदरणीय वैशालीताई देशमुख, सौ. निलमताई राणे, अनघाताई जोशी, उज्वलाताई शिंदे, अमिताताई चव्हाण यांनी घालून दिलेल्या संस्कारांची कमी प्रकर्षाने जाणवते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी मागील दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरून टीका केली आहे. ये भोगी !…शिक आमच्या ‘योगीं’कडून, अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना योगींकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. अनेकवेळा अमृता फडणवीस या त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ट्रोल होतात. मागील काही दिवसांपूर्वीही त्यांनी असंच एक ट्विट केलं होत. मात्र ते लगचे डिलीट केलं होतं. त्यावरूनही चांगलीच चर्चा रंगली होती. ट्विट डिलीट केल्याची चर्चा सुरू झाल्यावर पुन्हा तासाभरात तेच ट्विट केले होते.