हडपसर –सेलेना पार्क पाण्याच्या टाकीचे एकदा लोकार्पण झालेले असताना माजी नगरसेविका व भाजपने पुन्हा केलेल्या या कार्यक्रमाचा शिवसेनेकडून झेंडे दाखवत व घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला.

या निषेध आंदोलनाच्या वेळी उल्हास तुपे, नितीन गावडे, अभिमन्यू भानगिरे, इंतू शेख, सचिन तरवडे, प्रवीण हिलगे, योगेश सातव, गोरख पांचाळ, विश्‍वास पोळ, संतोष जाधव, आण्णा दायगुडे, विजय गब्दुले, सिद्धार्थ भानगिरे, बाबू होळकर, अयोध्या आंधळे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी कायदा व सुरक्षेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, या करीता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी विनंती केल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निषेध व्यक्‍त करीत कार्यक्रमस्थळ सोडले. परंतु, काळे-बोराटेनगर तसेच हांडेवाडी रोड भागातील सोसायट्या व नागरिकांना जोपर्यंत मुबलक पाणीपुरवठा होत नाही. तोपर्यंत मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य महापालिका निवडणूक लढविणार नाहीत, अशी घोषणा भानगिरे यांनी केली आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी केले हे विधान..

महापालिकेच्या माध्यमातून काळेपडळ येथे सुरू झालेल्या सेलेना पार्क पाण्याच्या टाकीचे लोकार्पण दि. 22 एप्रिल 2022ला मंत्री उदय सामंत व माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते झाले होते. नाना भानगिरे म्हणाले की, याच नगरसेविकेने काम संथगतीने सुरू असल्याचा आरोप करीत काम पूर्ण करण्यासाठी आम्हाला आव्हान दिले होते. मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका व पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी रात्रंदिवस उभा राहिलो. आता, पाण्याच्या टाकीतून नागरिकांसाठी पाणी सोडले जात असताना माजी नगरसेविका व भाजपने टाकी लोकार्पणाचा स्टंट उभा केला आहे. सध्या बंद असलेले सय्यदनगर व काळेपडळ ही दोन्हीही रेल्वेगेट भाजपने नागरिकांना वाहतुकीस खुली करून द्यावीत. केंद्रात त्यांची सत्ता असल्याने त्यांना ते शक्‍य आहे, असे आव्हान भानगिरे यांनी भाजपला केले आहे.