पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील विधी महाविद्यालय रस्त्यावरील ठाकरे यांच्या ‘राजमहाल’ या निवासस्थानी पूजा-विधी करण्यात येणार आहेत. यावेळी ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी पुण्यातील सुमारे दीडशे ते दोनशे पुरोहित उपस्थित राहणार आहेत.

पूजा-विधी आटोपल्यानंतर सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास ठाकरे पुण्याहून निघणार आहेत. त्यांच्यासोबत सुमारे शंभर वाहनांचा ताफा असणार आहे. पुण्याहून निघाल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते औरंगाबादच्या दिशेने रवाना होणार आहेत.रविवारी (ता.१) औरंगाबाद येथे सायंकाळी ठाकरे यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे यांचे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यात आगमन झाले. पुण्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी त्यांनी रविवारच्या औरंगाबाद येथील सभेच्या नियोजनाची चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचा  ओवेसी याच्या प्रतिमेवर थुंकून पतित पावन तर्फे निषेध आंदोलन

औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक जाणार आहेत. मुंबईतूनदेखील शेकडो मनसैनिक औरंगाबादच्या दिशेने रविवारी सकाळी निघणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाकरे यांच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांत पासून मनसेच्या सर्व सैनिकांकडून ठाकरे यांचा उल्लेख हिंदू जननायक असा जाणीवपूर्वक केला जात आहे. हिंदू धर्मीयांचे ‘मसीहा’ अशी राज ठाकरे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक तयार करण्यात येत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

पुण्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्याच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुण्यातून निघणाऱ्या मनसैनिकांसाठी ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत. पुण्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक सभेसाठी जाणार आहेत. दरम्यान, अक्षयतृतियेला पुण्यात मनसेच्या विभागनिहाय महाआरती आयोजित करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक विभागातील मंदीतरात महाआरती करण्यात येणार असून त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाकडे देण्यात आली आहे.