नव्या भारतात दिवसेंदिवस हत्यांची परंपरा वाढीस लागत आहे, अशी खंत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. समाजामध्ये विचारपूर्वक द्वेष पसरविला जात असून त्यासाठी इतिहासाचा वापरही होत आहे. हा द्वेष केवळ हिजाब आणि भोंग्यापर्यंत थांबणार नाही, तर तो उद्या तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण सतर्क राहिले पाहिजे, अशा शब्दांत गांधी यांनी सद्य:स्थितीवर भाष्य केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र फाउंडेशन, मासूम आणि परिवर्तन यांच्यातर्फे तुषार गांधी यांच्या हस्ते हरियाणातील अंशुल छत्रपती यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी गांधी बोलत होते. डॉ. हमीद दाभोलकर, मनीषा गुप्ते, मिलिंद देशमुख, दीपक गिरमे या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  माधुरीच्या चाहत्यांना धक्का! अभिनय सोडून घेतला ‘हा’ निर्णय

गांधी म्हणाले की, आपण वावरत आहोत ती परिस्थिती भयावह आहे. आशेचा किरण गायब होत चालला आहे. देशात एक घटक दुसऱ्या घटकासोबत राहणार नाही, याची दक्षता घेऊनच द्वेष पसरविला जात आहे. या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी निर्भयतेची गरज आहे. देशाच्या एकतेसाठी द्वेषाविरोधात सामूहिक लढाई आवश्यक आहे. नव्या भारताची केली जाणारी दिशाभूल थांबविण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. खुनी आणि बलात्काऱ्यांना आपण ‘बाबा’ म्हणून संबोधतो. खुन्यांना पदवी देणे म्हणजे बलिदान देणाऱ्यांचा अवमान आहे.

मारेकऱ्यांना शोधण्यात दिरंगाई का?

हरियाणातील रामचंद्र छत्रपती यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा झाली. मात्र, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात दिरंगाई झाली आहे. ज्या विचारधारेतून खून करण्यात आला, ती विचारधारा आणि त्यासंबंधित संस्थांचा तपासामध्ये विचार का केला गेला नाही? हरियाणात जे झाले ते महाराष्ट्रात का होऊ शकले नाही? असा प्रश्न उपस्थित करून तुषार गांधी यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब असल्याची खंत व्यक्त केली.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा शिवबंधनास नकार! `प्लॅन बी` मध्ये ही ३ नावे!

अंशुल छत्रपती म्हणाले, की माझे वडील रामचंद्र छत्रपती यांनी सच्चा डेराचे गुरमित रामरहिम याच्या विरोधात आवाज उठविला. हा आवाज दाबण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला. मात्र आम्ही घाबरलो नाही. आमचा लढा सुरूच ठेवला. शेवटी न्याय मिळाला. गुरमित रामरहिमला शिक्षा झाली. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आपल्या विचाराचा विस्तार देशभर करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. हा सन्मान रामचंद्र छत्रपतींच्या बलिदानाचा आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या चळवळीचा आहे.