मुंबई : बलात्काराच्या आरोपावरून भाजप नेते गणेश नाईक, शिवसेना नेते रघुनाथ कुचिक अडचणीत आलेले असतानाच आता आणखी एका शिवसेना नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने मुंबईतील साकीनाका पोलिस ठाण्यात लेखी तक्रारदेखील दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर साकीनाका पोलिसांनी राहुल शेवाळेंविरोधात अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणात तपास करत असल्याचे साकीनाका पोलिसांनी म्हटले आहे.

खासदार शेवाळे यांनी आरोप फेटाळले
खासदार राहुल शेवाळे यांनी मात्र आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांना शेवाळे यांनी सांगितले आहे की, माझ्याविरोधात करण्यात आलेली बलात्काराची तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुनेच ही तक्रार करण्यात आली आहे.

अधिक वाचा  अयोध्या दौऱ्याला विरोधाची रसद महाराष्ट्रातूनच पुरवली ; राज कडाडले

तक्रारी मागे कोण, याचा लवकरच पर्दाफाश – शेवाळे
बलात्कारांच्या आरोपांबाबत आपण सविस्तर बाजू मांडणार आहोत. मुंबई पोलीस आणि कायद्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. मी निर्दोष असल्यामुळे कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच, माझी बदनामी करण्यासाठी ज्या लोकांनी ही तक्रार केली, लवकरच त्यांचा पर्दाफाश करणार असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले.

शिवसेना नेते रहुनाथ कुचिक यांच्यावर 22 वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या पीडितेला मदत करत तिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, नंतर आपल्याला कुचिक यांच्याविरोधात वक्तव्य करण्यासाठी चित्रा वाघ यांनी दबाव आणला, असा आरोप पीडितेने केला होता. तसेच, लैंगिक अत्याचाराचे आरोप रघुनाथ कुचिक यांनी फेटाळले आहेत.

अधिक वाचा  घोडेगाव शासकीय आश्रमशाळेला ISO मानांकन

भाजप नेते गणेश नाईक यांच्याविरोधातदेखील एका महिलेने नवी मुंबई पोलिसांकडे बलात्काराची तक्रार दिली आहे. आपण 22 वर्षे गणेश नाईकांसोबत लिव्ह ईन राहत होतो. मात्र, लग्नाची मागणी करताच गणेश नाईकांनी आपल्याला मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केला आहे. याप्रकरणी गणेश नाईक सध्या नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरू आहे.