मुंबई : मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. तर, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची ‘भोगी’ म्हणून संभावना केली. राज यांच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही असं त्यांनी ठरवलं असेल तर काय करणार, असा टोला पाटील यांनी राज ठाकरे यांना हाणला.
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एकदा गुजरातचं कौतुक करून झालं, आता यूपीचं कौतुक करतील. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यांचं कौतुक करायला दौरे करतील. दुसर्या राज्यात जाऊन त्या राज्यांचं कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत, असंही ते म्हणाले. भाजप-मनसे युतीबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मनसेच्या या आधीच्या भूमिकेमुळं मुंबईतील हिंदी भाषिक मतदार आपल्यापासून लांब जातील याची भाजपला जाणीव आहे. त्यामुळं भाजपनं एक वेगळं नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू केलाय.’
भाजप २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार होता. पण शिवसेना भाजपसोबत असल्यामुळं राष्ट्रवादीनं त्यास नकार दिला, असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यात तथ्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. ‘आमची आघाडी कॉंग्रेसबरोबर होती आणि ही आघाडी विरोधी पक्षाचं काम करत होती. असं असताना भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली, असा सवाल करतानाच, या सगळ्या हवेतील गप्पा आहेत, असं ते म्हणाले.
‘महागाईचे दुष्परिणाम शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. भारतातही महागाई प्रचंड वाढलीय. त्याची जबाबदारी राज्यांवर टाकून हात झटकण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. पण, महागाईचं खरं मूळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही, असं पाटील म्हणाले.
‘केंद्र सरकार कुठल्याही राज्याला ‘आऊट ऑफ वे’ जाऊन फारशी मदत करू शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. त्यामुळं मोदीसाहेब वेगवेगळ्या राज्यात जाऊन ज्या घोषणा करतात, त्याला अर्थ नाही. पण, देशाचे पंतप्रधान बोलत असल्यानं लोकं ऐकून घेतात, काय करणार?,’ असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.