मुंबई : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून रवाना झाले आहेत. भगवी शाल अंगावर घेऊन राज ठाकरे मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाहून रवाना झाले. त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे रस्ते मार्गाने औरंगाबादला जाणार असल्याने ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. सुरुवातीला चेंबूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांचं त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली, फटाके फोडले आणि त्यानंतर अभिवादन स्वीकारुन राज ठाकरे नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम पुण्यात असेल.

अधिक वाचा  गणेश कला क्रीडामध्ये महिलांसाठीच्या राखीव जागांची आरक्षण सोडत

नाशिकमध्ये मनसेकडून रिक्षावर राज ठाकरेंचे फोटो चिटकवले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नशिकमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शहरातील रिक्षांवर राज ठाकरे यांची भगवी शाल असलेल्या छबी असलेले स्टिकर चिकटवले जात आहेत. सभा औरंगाबादला जरी असली तरीही नाशिकमध्ये मनसेकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र मनसेचे कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर असून त्यांनी मनसैनिकांना नोटीस दिली जात आहे.

अटी-शर्तींसह राज ठाकरेंच्या सभेला परवानगी

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली असली तरी राज ठाकरे पोलिसांच्या अटी मान्य करणार का याकडे आता लक्ष लागलं आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेने सभेची जय्यत तयारी केली आहे आणि पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केलाय. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करु नये अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. पण राज ठाकरे ही नोटीस स्वीकारणार का आणि त्यातल्या अटी मान्य करणार का याबाबत उत्सुकता आहे.

अधिक वाचा  विनायक मेटेंच्या विधान परिषद विक्रमात सहा वर्षांची भर पडेल का ?

राज ठाकरेंच्या सभेसाठी ‘या’ अटी-शर्ती :

ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे

लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही

1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी

सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
वाहन पार्किंगचे नियम पाळावे

सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही

सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल

अधिक वाचा  देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान’

सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये.