पुणे : पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळा प्रकरणी भाजपच्या महिला नेत्याला कर्नाटक सीआयडीने पुण्यातून अटक केली आहे. गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामीनासाटी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना गुरुवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली. याबाबतची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी दिलीय.

पीएसआय पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून ६० लाख रुपयांची लाच घेण्याचा करार झाला होता. तसंच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती सीआयडीच्या तपासातून समोर आली होती. दिव्या हागारगी या ज्ञान ज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ, अर्चना, शांतीबाई या शिक्षिका आणि कनिष्ठ अभियंता मंजुनाथ मेळकुंडी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यानंतर अटक वॉरंट जारी केले होते. तसंच आरोपींना एक आठवड्याच्या आत तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासही सांगण्यात आलं होतं.

अधिक वाचा  'हाच फडणवीस तुमच्या सत्तेच्या (बाबरी) ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही'

सीआयडीने याआधी एन व्ही सुनीलकुमारला या प्रकरणी अटक केली आहे. ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस वापरून त्याने परीक्षा दिली होती. तो पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. याच प्रकरणात आधी अटक केलेल्या रुद्रगौंडा पाटील याने दिलेल्या माहितीच्या मदतीने तपास करण्यात आला. सुनीलकुमार याचाही गैरप्रकारात सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर त्याला सीआयडीने ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, पीएसआय भरतीत झालेल्या या गैरप्रकारानंतर राज्य सरकारने काही अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये राज्यसरकारच्या भरती विभागातील एएमडीपी अमृत पॉल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अमृत पॉल हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची बदली अंतर्गत सुरक्षा दलाच्या एडीजीपीपदी करण्यात आली आहे. काँग्रेसकडून अमृत पॉल यांच्यावर या भरती घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता.