मुंबई – मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. याअंतर्गत ‘ईडी’ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या प्रकरणात ईडीने सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान, आज खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.
यापूर्वी ईडीने भावना गवळी यांना तीन समन्स पाठवली होती. मात्र, भावना गवळी एकदाही ईडीच्या चौकशीला उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे आता ईडीने भावना गवळी यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलल्याची चर्चा आहे. यावेळी चौकशीला हजर न राहिल्यास भावना गवळी यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार भावना गवळी यांना पुढील आठवड्यात ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘ईडी’ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी ४ ऑक्टोबरला समन्स बजावले होते. त्यानंतर १५ दिवसांनी त्यांना पुन्हा ‘ईडी’ने समन्स बजावले होते. पण चिकनगुनिया झाल्याचे सांगत त्यावेळीसुद्धा भावना गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यानंतर बजावण्यात आलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही भावना गवळी चौकशीसाठी हजर झाल्या नव्हत्या.