मुंबई : राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. त्यानंतर संजय  राऊतांनी  आज राज ठाकरेंना टोला लगावला आहे. भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. योगी कोण आणि भोगी कोण? तसेच योगींबद्दल अचानक मतपरिवर्तन कसं काय झालं? हा संशोधनाचा विषय आहे. कोणाला यावर पीचडी करायची असेल तर करायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशात भोंगे उतरविण्यात आलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देखील न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं, अशी सरकारची भूमिका आहे. भोंग्यांचा विषय राजकीयदृष्ट्या तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण जाहीर करावं, असंही राऊत म्हणाले.

अधिक वाचा  सलमानने कंगनाला संजय लीला भन्साळींकडे पाठवले तेव्हा ते म्हणाले, "तु तर..."

देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे त्या राज्यांबाबत पंतप्रधानांनी अधिक संवेदनशील राहणे गरजेचे आहे. पण, पंतप्रधान तसं करत नाहीत. बिगरभाजपशासित राज्यांना सावत्र वागणूक दिली जाते, असे आरोप संजय राऊतांनी केले आहे. तसेच त्यांनी मोहन भागवतांनी धर्म आणि हिंसेबाबत केलेल्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही धर्म हिंसेचा मार्ग अवलंबत असेल तर तो धर्म अधोगतीला जातो, या मोहन भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत व्हायला पाहिजे. याचं आपल्याच देशात मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

अधिक वाचा  २१ जिल्ह्यांत निवडणुकांवर पावसाचे सावट! सरासरीपेक्षा अधिक पाऊस

राज ठाकरेंच्या सभेवरून टोला –
राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होत आहे. काही अटी-शर्ती घालत सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून संजय राऊतांनी टोला लगावला आहे. महाराष्ट्रात अनेकजण सभा घेतात. सभेत काही विशेष नाही. त्यांच्या सभेच्या दिवशी राज्यात सहा सभा आहेत, असं राऊत म्हणाले.