हडपसर –हडपसर म्हणजे वाहतूक कोंडी, अशी ओळख निर्माण झालेली असताना एकही वाहनतळ तळ नसलेले उपनगर म्हणूनही उल्लेख केला जाऊ लागला आहे. याच कारणातून चालक मोकळी जागा दिसेल तेथे वाहन उभे करीत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे.

तर, वाहतूक पोलीस दिसले तेथून वाहन उचलून कर्तव्य बजावण्यात दक्ष आहेत. यातून हडपसर परिसरातील नागरिक त्रस्त असून स्वतंत्र वाहनतळ उभारावे, अशी मागणी होत आहे.

हडपसरमध्ये वाहनांची मोठी वर्दळ आणि त्यातून वाहतूक कोंडी होत असते. शिवाय, येथे कोठेही फोर व्हिलर, टू व्हिलर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नाही. आधीच वाहतूक कोंडी त्यात पार्किंगची व्यवस्था नसल्याने दिसेल त्या ठिकाणी वाहने अस्ताव्यस्त उभी करावी लागत आहेत. यातून वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. शहरात ज्याप्रमाणे पी-1, पी-2 पार्किंगची व्यवस्था असते त्यानुसार हडपसरमध्ये कोठेही नियोजन नाही. मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाखाली जागा असली तरी त्या ठिकाणी राडारोडा व अनधिकृत पथारीवाले असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करता येत नाहीत. त्यामुळे रस्त्यालगत वाहने उभी करावी लागत आहेत. त्यातच वाहतूक पोलीस अनेकदा गाड्या उचलून नेत असल्याने नागरिकांना वाहतुकीचा दंड सोसून मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून वाहतूक पोलिसांशी अनेकदा वादविवादाचे प्रसंग घडत आहेत. हडपसरमध्ये जेथे वाहतूक कोंडी असते तेथील अडथळा करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करायची सोडून येथे रस्त्यालगत उभ्या केलेल्या गाड्या वाहतूक पोलीस उचलत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

अधिक वाचा  सोलापूर भूषण पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना ‘पुणे रत्न कार्यवैभव पुरस्कार’ राहीबाई पोपरे यांना जाहीर

पुणे-सोलापूर महामार्गावर किर्लोस्कर पुलापासून ते रविदर्शन यादरम्यान पार्किंग समस्या आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहनांसाठी रस्त्याकडेला पार्किंगचे पट्टे, सम व विषम तारखा आखून व अनधिकृत व्यवसायांना प्रतिबंध करून स्वतंत्र वाहनतळ उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.