पुणे- सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या उजवा मुठा कालवा रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. या रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण होत आले असून दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण झाले आहे.येत्या महिन्याभरात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.

सिंहगड रस्त्याला पर्याय रस्ता ठरणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आवश्‍यक होता. परंतु, महापालिकेकडून निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. वर्षभरानंतर निधी उपलब्ध झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला गती मिळाली. पर्यायी रस्ता नसताना ही राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पालिकेने हाती घेतल्याने सिंहगड कोंडी होत होती. आता, पर्यायी रस्ता उपलब्ध होत असल्याने वाहतूक कोंडी फुटणार आहे.

अधिक वाचा  शिवसेनेची संभाजीराजे छत्रपती यांना जागा; त्यापेक्षा शिवसेना काय करु शकते - संजय राऊत

दरम्यान, सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महापालिकेने मुठा नवीन उजवा कालव्याच्या बाजूने फनटाईम चित्रपटगृह ते पु.ल. देशपांडे उद्यान पर्यायी रस्ता करण्याचे प्रस्तावित केले, त्यातील फनटाईम चित्रपटगृह ते हिंगणे या दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी चौकातून येणाऱ्या सर्व वाहनांकडून या रस्त्याचा वापर सध्या सुरू आहे. हिंगणे ते पु.ल. देशपांडे उद्यान या दरम्यानच्या रस्त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले असून पाचशे मीटर लांबीचे काम रखडले आहे. हे काम पूर्ण करून या रस्त्याची रुंदी साडेसात मीटर करण्यासाठी तीन कोटींचा निधी आवश्‍यक आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा निधी पथ विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आला नव्हता.