मुंबई – नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पातील कोणत्याही कामासाठी व घटकांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यास पैसे किंवा कसलीही लाच देण्याची आवश्यकता नाही. पोकराची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक असून, कोणीही लाच मागितल्यास लाभार्थी शेतकऱ्यांनी तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या टोल फ्री क्रमांकाशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे https://acbmaharashtra.net/marathi/bribe_complaint या वेबसाईट लिंकवर किंवा acbwebmail@mahapolice.gov.in या ईमेलला ऑनलाईन तक्रार करता येईल.

‘पोकरा’मध्ये असा थेट मिळतो लाभ

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्यासाठी विविध घटकांकरीता ५० ते १०० टक्क्यांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात येते. कोणत्याही घटकाचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. पोकरा प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट गावांतील शेतकरी https://dbt.mahapocra.gov.in/ या डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून थेट अर्ज करू शकतात. यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी शेतकऱ्यांना साहाय्य करतात. शेतकऱ्याचा प्रस्ताव अर्ज एकूण सात टप्प्यांतून जातो. प्रत्येक टप्प्यावर आपल्या अर्ज स्थिती काय आहे याची माहिती शेतकऱ्याला थेट मोबाईलवर मिळते.

अधिक वाचा  अयोध्या दौऱ्याला विरोधाची रसद महाराष्ट्रातूनच पुरवली ; राज कडाडले

अशी आहे पारदर्शक प्रक्रिया

शेतकऱ्याने किंवा शेतकरी उत्पादक गटाने एखाद्या घटकाच्या लाभासाठी अर्ज केल्यावर त्याची पडताळणी करण्यात येते. नंतर गावपातळीवर ग्राम कृषी संजीवनी समितीच्या बैठकीत अर्जाला मान्यता मिळाल्यावर संबंधित कृषी सहायक हे शेतकऱ्याच्या जागेची तांत्रिक पाहणी करतात.

यानंतर काही घटकांना तालुका कृषी अधिकारी, तर काही घटकांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून पूर्वसंमती देण्यात येते. शेतकरी संबंधित घटकांची स्वतः खरेदी करून काम पूर्ण केल्यावर बिले ऑनलाईन सादर करायची आहेत. कृषी सहायक किंवा पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपजिल्हा कृषी अधिकारी यापैकी एक प्राधिकृत अधिकारी संबंधित कामाची मोका तपासणी करून ते पूर्ण केले असल्यास तो प्रस्ताव उपविभागीय स्तरावरील लेखा अधिकाऱ्याकडे ऑनलाईन पाठवला जातो.

अधिक वाचा  वैष्णव मांदियाळीला कैक अडथळे; परी मनी आस पाहू रूप तुझं सावळे...

लेखा अधिकाऱ्यानंतर ते ऑनलाईन पडताळणी केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी त्यास अंतिम मंजुरी देऊन अनुदाग अदायगीसाठी तो प्रस्ताव प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकडे पाठवतात. पकल्प व्यवस्थापन कक्षाकडून अनुदान अदायगी करण्यासाठी बँकेला निधी वितरणाची सूचना देण्यात येते. यानंतर संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक खात्यात मंजूर रक्कम थेट जमा करण्यात येते.

पोकरा अंतर्गत अर्ज करताना तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास शेतकरी आपल्या भागातील समूह सहायक किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. तसेच पोकरा प्रकल्प व्यवस्थापन कक्षाशी 022-22153351 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी सांगितले.